होलोकॉस्टसारख्या कालखंडाचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा - आदित्य ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:33 IST2021-02-05T04:33:57+5:302021-02-05T04:33:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - होलोकॉस्टसारखा महत्त्वाचा कालखंड, त्यातील घटना आणि त्याचा अभ्यास, त्यादरम्यान घडलेली कृत्ये, संहार, शिवाय त्यातूनही ...

होलोकॉस्टसारख्या कालखंडाचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा - आदित्य ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - होलोकॉस्टसारखा महत्त्वाचा कालखंड, त्यातील घटना आणि त्याचा अभ्यास, त्यादरम्यान घडलेली कृत्ये, संहार, शिवाय त्यातूनही जे लोक वाचले त्यांचे पुढील आयुष्य या साऱ्यांचा आपण अभ्यासक्रमात समावेश करू शकतो का, अशी विचारणा महाराष्ट्राचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना केली आहे. सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मृती दिन आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते संबोधित करीत होते.
जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपण पुढे जात असताना अनेकांना एकछत्री अंमल किंवा हुकूमशाही असावी असे वाटत असते. मात्र, होलोकॉस्टसारख्या मोठ्या घटनेने काळाची गती कशी बदलली, विविध जाती, धर्म, पंथातील लोक एकत्र येतो तेव्हा समाज कसा घडतो हे आजच्या पिढीला कळणे गरजेचे आहे, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीची नाझी राजवट, तसेच त्यांच्या मित्र देशांकडून ६० लाख ज्यू, तसेच लाखो रोमा, समलैंगिक, शारीरिक आणि मानसिक रुग्ण आणि अन्य लोकांचे हत्याकांड करण्यात आले. या हत्याकांडाला होलोकॉस्ट म्हणून संबोधले जाते. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने २७ जानेवारी हा आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मृती दिन म्हणून घोषित केला आहे. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इस्रायलच्या वाणिज्य दूतावासाने मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने एका श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कोट
काय आहे ‘काळोखातील प्रकाशरेषा’
याप्रसंगी वरिष्ठ पत्रकार सुचिता देशपांडे यांच्या ‘काळोखातील प्रकाशरेषा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक फ्रीडल (फ्रेडरिका) डिकर ब्रांडाइस या शिक्षिकेबद्दल आहे, जिने दुसऱ्या महायुद्धादरम्यान झेकोस्लोवाकियामधील तेरेझिन छळ छावणीत शेकडो मुलांना चित्रकला, संगीत आणि नाट्य प्रशिक्षणाद्वारे जगण्याची नवी उमेद दिली.