सॅटेलाइट सर्वेक्षण करा
By Admin | Updated: December 17, 2014 01:55 IST2014-12-17T01:55:47+5:302014-12-17T01:55:47+5:30
कुर्ला ते अंधेरीदरम्यानच्या मार्गाचे रुंदीकरण करण्यापूर्वी येथील झोपड्यांचे सॅटेलाइट सर्वेक्षण करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी

सॅटेलाइट सर्वेक्षण करा
मुंबई : कुर्ला ते अंधेरीदरम्यानच्या मार्गाचे रुंदीकरण करण्यापूर्वी येथील झोपड्यांचे सॅटेलाइट सर्वेक्षण करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी येथून जोर धरू लागली आहे. मुळात प्रकल्पादरम्यानचे काम पारदर्शक व्हावे आणि कोणतेही कुटुंब बेघर होऊ नये, अशी मुख्य भूमिका येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
कुर्ला-अंधेरी मार्गाच्या रुंदीकरणासाठी महापालिकेच्या ‘एल’ विभागाने पावले उचलली आहेत. ‘एल’ विभागाने कुर्ला-अंधेरी मार्ग रुंदीकरणात बाधित बांधकामांची पात्रता/अपात्रता यादी प्रसिद्ध केली आहे. रुंदीकरणाच्या कामात अडसर ठरणाऱ्या बांधकामांना या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. बाधितांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर आता पात्र-अपात्रांची यादी एल वॉर्डने प्रसिद्ध केली आहे. यादीबाबत आक्षेप असल्यास ‘एल’ विभागाच्या कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे. मात्र रुंदीकरणासह त्याचे श्रेय लाटण्यासाठी राजकीय पक्षांमध्येही कमालीची चढाओढ निर्माण झाली आहे.
दरम्यान, कुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील यांनी एल विभागाला एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनात कुर्ला ते अंधेरीदरम्यानच्या मार्गाचे रुंदीकरण करण्यापूर्वी येथील झोपड्यांचे सॅटेलाइट सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. कमानी, बैल बाजार, तार गल्ली, जरीमरी, सफेद पूल, विजय प्रिंट आणि साकीनाका जंक्शन येथील झोपड्यांचे सॅटेलाइट सर्वेक्षण करावे. असे केल्याने भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि प्रकल्पाचे काम पारदर्शक होईल, असे त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)