विकासकामांनाच जनता मत देणार
By Admin | Updated: October 7, 2014 00:02 IST2014-10-07T00:02:09+5:302014-10-07T00:02:09+5:30
येत्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी होवून शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील विधानसभेवर भरारी घेतील
विकासकामांनाच जनता मत देणार
पनवेल : येत्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी होवून शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील विधानसभेवर भरारी घेतील, असा विश्वास आज आमदार विवेक पाटील यांनी व्यक्त केला. पनवेल विधानसभा मतदार संघातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचा सारांश असलेल्या ‘भरारी’ पुस्तकाचे प्रकाशन आज आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते झाले.
विवेक पाटील पुढे म्हणाले की, बाळाराम पाटील यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सभापती म्हणून केलेली कामे प्रचंड आहेत, परंतु सर्वच कामे आम्ही सांगायला गेलो, तर त्याचा भला मोठा गं्रथ तयार होईल. याचेच भान ठेवून ठळक कामांचाच लेखाजोखा मांडलेला आहे. आमच्या कामांचा आम्हाला विसर पडला असला तरी जनता मात्र या कामांना विसरलेली नाही, म्हणूनच या विधानसभा निवडणुकीत बाळाराम पाटील विजयी होतील व लवकरच आपण त्यांना माझ्यासोबत विधानसभेत पहाल, असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला.
बाळाराम पाटील यांच्यावरील भरारी या पुस्तकामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सभापती असताना केलेली कामे तसेच समाजहितासाठी केलेली आंदोलने, विविध उपक्रम यांचा समावेश करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने शिवछत्रपतींची समाधी, एसईझेड विरोध, करिअर गाईडन्स शिबिर, हस्ताक्षर स्पर्धा, रोजगार मेळावा आदींचा समावेश आहे.