जनताच पवारांना कात्रजचा घाट दाखवेल : केसरकर
By Admin | Updated: September 25, 2014 00:22 IST2014-09-24T23:09:04+5:302014-09-25T00:22:51+5:30
माजी आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर असा जोरदार हल्ला चढवला.

जनताच पवारांना कात्रजचा घाट दाखवेल : केसरकर
सावंतवाडी : राष्ट्रवादीकडे उमेदवार नसल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांना शिवसेनेचाच माणूस उमेदवार म्हणून द्यावा लागला, यासारखे दुर्दैव नाही. सह्याद्रीच्या कुशीत राहणाऱ्या कोकणी जनतेला कात्रजचा घाट दाखविण्यास निघालेल्या शरद पवार यांना कोकणी जनताच कात्रजचा घाट दाखवेल, असा जोरदार हल्ला माजी आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर चढवला.
ते सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, जर सुरेश दळवी यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून उमेदवारीच हवी होती, मग त्यांनी माझ्याबरोबर येण्याचे नाटक का केले? दळवी दहशतवादाविरोधात लढत होते. मग आता त्यांच्याच साथीने कसे काय गेले? गेले तीन दिवस त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माझाही वेळ वाया का घालविला, असा सवालही त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसला माझ्या विरोधात सावंतवाडी मतदारसंघात उमेदवार मिळत नव्हता. म्हणून त्यांना शिवसेनेचाच एक माणूस फोडावा लागला; पण त्याचा कोणताही परिणाम होणार नसून, दोडामार्गमधील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी
आजही ठाम असल्याचे सांगत, त्यांनी राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार
व इतर नेत्यांवर टीकास्त्र सोडत सह्याद्रीच्या कडेकपारीत राहणाऱ्या कोकणी जनतेलाही घाटांचा
अनुभव आहे. त्यामुळे पवारांनाच कोकणी जनता कात्रजचा घाट दाखवेल. सहसंपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, अजित सावंत, रूपेश राऊळ, एकनाथ नारोजी उपस्थित होते. (प्रतिनिधी)