जनआंदोलन पेटतेय!
By Admin | Updated: March 17, 2015 00:50 IST2015-03-17T00:50:34+5:302015-03-17T00:50:34+5:30
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रिलायन्सला ‘फोर जी’ मोबाइल टॉवर उभारण्याची परवानगी दिल्यानंतर आता याविरोधात मोठे जनआंदोलन उभे राहिले आहे.

जनआंदोलन पेटतेय!
मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रिलायन्सला ‘फोर जी’ मोबाइल टॉवर उभारण्याची परवानगी दिल्यानंतर आता याविरोधात मोठे जनआंदोलन उभे राहिले आहे. आता या प्रकरणी स्वयंसेवी संस्थांची बाजू ऐकण्यात यावी, असा सूर लावला जात आहे. ‘फोर जी’ टॉवरविरोधातील जनभावना लक्षात घेऊन ‘लोकमत’ने देखील या आंदोलनांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे ठरविले आहे.
ग्लोबल मोबाइल सप्लायर्स असोसिएशनच्या एका अहवालानुसार, २०१४ साली जगभरात ‘फोर जी’ मोबाइल टॉवर सेवा पुरविणाऱ्या पुरवठादारांची संख्या ३६ टक्क्यांनी वाढली. त्यापैकी ४४ टक्के पुरवठादार १८०० एमएचझेड बँड सेवेचा वापर करत आहेत. शिवाय २०१४ सालापर्यंत तब्बल १२४ देशांत ‘फोर जी’ मोबाइल टॉवर्सचे जाळे पसरले असून, भारती एअरटेल, आयडिया सेल्यूलर, व्होडाफोन आणि रिलायन्स या खासगी कंपन्यांत ‘फोर जी’ मोबाइल टॉवर्स सेवा पुरविण्यासाठी स्पर्धा आहे. दुसरीकडे मुंबईतील १ हजार १०६ मोकळ्या भूखंडांवर मोबाइल टॉवर उभारण्यात येणार आहेत. आणि त्याचा सर्वाधिक फटका माटुंगा, चेंबूर, सायन, भांडुप, घाटकोपर, मुलुंड येथील नागरिकांना बसणार आहे.
महापालिका आणि संबंधित कंपनीने बैठक घेत याबाबत ठोस माहिती द्यावी. मोकळ्या मैदानांसह उद्यानात ‘फोर जी’ मोबाइल टॉवर्स उभारण्याबाबत नक्की काय भूमिका आहे? हे विषद करावे, असे विविध संघटनांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
जनआंदोलनचा इशारा
म्हाडा संकुलात १ टॉवर असताना त्यात ‘फोर जी’ टॉवरची भर घालण्यात येत आहे. मात्र येथे ‘फोर जी’ टॉवर आम्ही उभा राहू देणार नाही. यासाठी प्रत्येक घरातील महिला पुढे आली असून, याविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे.
- रवींद्र नाईक, अध्यक्ष,
मुलुंड म्हाडा कॉलनी असोसिएशन
च्च्
प्रत्येक टॉवरला विरोध करू
चेंबूरमधील उद्यानात ‘फोर जी’ मोबाइल टॉवर्स उभारण्याच्या आम्ही विरोधात आहोत. आम्ही आंदोलन हाती घेतले आहे. ७५ टॉवर तर दूर आम्ही एक मोबाइल टॉवरदेखील उभा राहू देणार नाही. या प्रकरणी आम्ही चेंबूर येथील एम/पश्चिमच्या अधिकारी वर्गाची भेट घेतली आहे. त्यांनी दहा दिवसांत याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
- बाबासाहेब गोपले, अध्यक्ष, अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी
माँसाहेब मीनाताई ठाकरे मैदानात उभारलेल्या टॉवरमुळे भीतीने मुलांनी तेथे जाणे बंद केले आहे. याविरोधात तीन हजार नागरिकांच्या राबविलेल्या स्वाक्षरी मोहिमेचे पत्र मुख्यमंत्र्यांसह सर्वांना देण्यात आले आहे. मात्र कोणीही मदतीसाठी पुढाकार घेतलेला नाही.
- मनोहर शिंदे, अध्यक्ष, सरदार प्रतापसिंग संकुल रहिवासी असोसिएशन, भांडुप
आधी अभ्यास करा...
नवीन तंत्रज्ञान आल्यानंतर त्याचा संपूर्ण अभ्यास केल्यावरच अंमलबजावणी झाली पाहिजे़ त्यामुळे ‘फोर जी’ आणण्याआधी त्याची नीट चाचपणी झाली पाहिजे़
- शैलेश पवार, ट्रेडर
रहिवाशांना विश्वासात न घेताच पालिकेने या ‘फोर जी’ टॉवर्सना परवानगी दिल्याचे समजताच चेंबूरमधील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. मात्र कंपनीकडून काही नगरसेवक आणि नेत्यांना हाताशी धरले जात असल्याने सध्या हा लढा कमी होत आहे. मात्र आम्ही याविरोधात लवकरच जनहित याचिका दाखल करणार आहोत.
- सुभाष मराठे, मुख्य निमंत्रक,
चेंबूर मैदान बचाव समिती
‘फोर जी’च्या परवानगीबाबत आम्ही माहिती अधिकाराखाली माहिती काढत आहोत. शिवाय इतर देशांमध्ये कशाप्रकारे ‘फोर जी’ टॉवर बसवण्यात आले आहेत आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो, यावरदेखील आमचा अभ्यास सुरू आहे. मात्र काहीही झाले तरी आम्ही ‘फोर जी’ टॉवर लावू देणार नाही.
- अॅड. नितीन निकम, सरचिटणीस,
टिळक नगर रेसिडेन्सी वेल्फेअर असोसिएशन
फास्ट नेटवर्कसाठी
‘फोर जी’ला विरोध चुकीचा आहे़ कारण प्रगतीच्या स्पर्धेत आपण मागे पडायला नको़ याआधीही ‘थ्री जी’ आले तेव्हा विरोध झालाच होता़ मात्र फास्ट नेटवर्क सर्वांनाच हवे आहे़ आता ‘व्हॉट्सअॅप’ने तर सर्वांनाच वेड लावले आहे़ त्यामुळे फास्ट नेटवर्कसाठी ‘फोर जी’ हवेच.
- अनुप जाधव, टूर आॅपरेटर