डंम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न प्रलंबित
By Admin | Updated: February 13, 2015 22:48 IST2015-02-13T22:48:26+5:302015-02-13T22:48:26+5:30
प्रभाग क्र. ६३ मध्ये वालीव, सातिवली आणि कोल्ही या भागाचा समावेश आहे. वालीव व सातिवली येथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र आहे.

डंम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न प्रलंबित
दिपक मोहिते, वसई
प्रभाग क्र. ६३ मध्ये वालीव, सातिवली आणि कोल्ही या भागाचा समावेश आहे. वालीव व सातिवली येथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र आहे. परंतु या औद्योगिक क्षेत्रात प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्यावर कारवाई करण्याकडे मात्र, प्रभाग समिती सभापतींचे दुर्लक्ष होत आहेत. तशातच महानगरपालिकेने येथे डम्पिंग ग्राऊंड उभारण्याचे प्रयत्न चालवले आहेत परंतु स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्यामुळे हे काम मार्गी लागू शकत नाही.
साडेचार वर्षात जवळपास १६ कोटी रू. ची विकासकामे झाल्याचा दावा स्थानिक नगरसेवक व प्रभाग समिती ड चे सभापती रमेश घोरकाना यांनी केला आहे. या प्रभागातील वालीव आणि सातिवली या दोन्ही गावात प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली. विशेष म्हणजे चाळी व इमारती न उभारता अनेक समाजकंटकांनी अनधिकृत गोदामे उभी करून कंपन्यांना भाडेतत्वावर दिली आहेत. ही गोदामे सरसकट सरकारी जागेवरही बांधण्यात आली. परंतु त्यावर कारवाई करण्यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनही पावले उचलीत नाही. येथे डम्पिंग ग्राऊंड उभारण्यासाठी ३ वर्षे महानगरपालिका प्रयत्नशील आहे. परंतु स्थानिक जनतेचा त्यास कडाडून विरोध आहे त्यामुळे हे काम मार्गी लागत नाही. साफसफाईच्या कामावरही स्थानिक नगरसेवकाचा वचक नसल्यामुळे दैनंदिन कचरा उचलणे ही कामे वेळेवर होत नाहीत. येथील ठेकेदार मंजूर कामगारापेक्षा कमी कामगार कामावर ठेवत असल्यामुळे साफसफाईची कामे प्रभावीरित्या होत नाहीत. तसेच पाण्याचा प्रश्नही गेली अनेक वर्ष या प्रभागाला भेडसावत आहे. या संपूर्ण परीसरात स्थानिक रहिवाशांना कमी पाणी मिळते त्यामुळे ऐन उन्हाळ्यात येथील नागरीकांची फरफट होत असते.