Join us  

मुंबईत बेशिस्त वाहनचालकांना दणका; नियम मोडल्याने १५ कोटी वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 9:45 AM

नऊ दिवसांत दणदणीत कारवाई.

मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेकडो चालकांना ई-चलानद्वारे दंड ठोठावण्यात आला होता. लोकअदालतीपूर्वी दंडाची रक्कम भरण्यासाठी नोटीस धाडताच १ ते ९ डिसेंबर या कालावधीत २ लाख ३७ हजार ७०४ ई-चलानमधून १५ कोटी २४ लाख ९९ हजार २५० रुपये जमा झाले आहेत. ही आकडेवारी शनिवारी झालेल्या लोकअदालतीच्या पूर्व दिनापर्यंतची असून, शनिवारी लोकअदालतीत ८५० वाहनचालकांनी २८ लाख २१ हजार ३०० रुपयांचा दंड भरला आहे. 

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वन स्टेट वन ई-चलानद्वारे कारवाई केली. तसेच अपराधाची व तडजोडपात्र दंडाची रक्कम भरणा करण्याचे संदेश भ्रमणध्वनीवर पाठविण्यात येतात. तरीदेखील अनेक वाहनचालक थकीत दंडाची रक्कम भरीत नाहीत. 

‘ई-चलान सवलत नाही’

एका बसचालकाने सांगितले की, मुंबईत ई-चलान लोकअदालतीसाठी २०० हून अधिक बसचालक, टॅक्सी आणि इतर गेले. १०० पेक्षा जास्त स्कूल बस मालकही ई-चलान काढण्यासाठी गेले होते. आयुक्तांनी अर्धे चलान माफ करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, वाहतूक पोलिसांनी कोणतीही सवलत नसून तुम्ही पूर्ण रक्कम द्या भरण्यास सांगितले.मोटार वाहन अधिनियमांचे अपराध करणारे एकूण १७ लाख १० हजार ५१९ वाहनचालकांना जिल्हा विधिसेवा प्राधिकरण, मुंबईमार्फत प्रलंबित दंडाची रक्कम भरणा करण्याबाबत नोटीस पाठविल्या होत्या. तसेच, लोकअदालतीमध्ये थकबाकी भरण्याचे आवाहन देखील केले होते. शनिवारी झालेल्या लोकअदालतीमध्ये ८५० वाहनचालकांकडून  २८ लाख २१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला. वर्ष २०१९ ते २०२३ या कालावधीत ई-चलानचे ६८५ कोटी रुपये प्रलंबित आहेत.

जे चालक लोकअदालतमध्ये हजर राहिले नाहीत, त्यांच्या केसेस न्यायालयात पाठविण्यात येणार असून उद्यापासून पुढील कायदेशीर कारवाई सुरू होईल - प्रवीण पडवळ, सह पोलिस आयुक्त, वाहतूक

शालेय विद्यार्थ्यांना घेताना आणि सोडताना बसचा फोटो टाकताना फोटो क्लिक केला जातो, ही आमची चूक आहे का?  त्याबाबतची १० ई-चलानसह पोलिस आयुक्त वाहतूक यांना दाखवली आहेत. त्यावेळी त्यांनी ई-चलान देणे बंद करण्याचे आश्वासन दिले. पण तरीही वाहतूक पोलिस ई-चलान देत आहेत. स्कूल बसचे ई-चलान माफ न केल्यास अधिवेशनादरम्यान नागपूरला जाऊन आंदोलन केले जाईल - अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोसिएशन

टॅग्स :मुंबईवाहतूक पोलीस