हॉल व्यवस्थापनाला ग्राहक मंचाने सुनावला दंड
By Admin | Updated: October 21, 2014 23:56 IST2014-10-21T23:56:31+5:302014-10-21T23:56:31+5:30
हॉलचे आरक्षण रद्द केल्यावरही डिपॉझिट परत न देणा-या हॉलच्या मालकाला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दणका दिला आहे.

हॉल व्यवस्थापनाला ग्राहक मंचाने सुनावला दंड
ठाणे : हॉलचे आरक्षण रद्द केल्यावरही डिपॉझिट परत न देणा-या हॉलच्या मालकाला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दणका दिला आहे. डिपॉझिटची रक्कम ९ टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश मंचाने दिले आहेत.
अण्णाजी पाटील यांनी मुलगी नेत्रा हिच्या विवाहासाठी डोंबिवली येथील जगदीश बँक्वेट हॉल १ सप्टेंबर २००९ रोजी २१ हजार अनामत रक्कम धनादेशाद्वारे देऊन आरक्षित केला. मात्र, वरपक्षाला ती जागा अयोग्य वाटल्याने ५ सप्टेंबरला पाटील यांनी आरक्षण रद्द करण्याचे कळवून अनामत रकमेची मागणी केली. परंतु, ती मागणी जगदीश बँक्वेट हॉलच्या वतीने नाकारल्याने पाटील यांनी त्यांच्याविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. हॉलचे जगदीश कारिया यांनी पाटील हे ग्राहक नाहीत. तसेच पावतीवरील अटीप्रमाणे आगाऊ रक्कम परत मिळणार नसल्याचे सांगितले.
कागदपत्रे, घटनांचा विचार करून हॉल नोंदणीसाठी केवळ २५ टक्के रक्कम भरणे गरजेचे होते. पाटील यांनी भरलेली २१ हजार ही रक्कम २५ टक्के आहे का, याचा उल्लेख नसल्याचे मंचाने स्पष्ट केले.
आरक्षण रद्द केल्यापासून ते विवाहाच्या तारखेपर्यंत त्याच हॉलसाठी किती जणांनी चौकशी केली, ती यादी मंचाला दिली नाही. तसेच पावतीवर असलेल्या अनेक अटी एकमेकांशी विसंगत आहेत. त्यामुळे त्या प्रमाण मानता येणार नसल्याचे मंचाने सांगितले. परिणामी, हॉल व्यवस्थापनाने पाटील यांना २१ हजार डिपॉझिट हे ९ टक्के व्याजासह द्यावेत, असे आदेश मंचाने दिले आहेत. (प्रतिनिधी)