टीएमटीने काढले दंडवसुलीचे फर्मान
By Admin | Updated: May 5, 2015 00:01 IST2015-05-05T00:01:18+5:302015-05-05T00:01:18+5:30
परिवहनचे चाक आजही खोलात रुतले असून कर्मचाऱ्यांची तब्बल १२५ कोटींची देणी थकीत आहेत. असे असताना कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्याऐवजी आता

टीएमटीने काढले दंडवसुलीचे फर्मान
अजित मांडके, ठाणे
परिवहनचे चाक आजही खोलात रुतले असून कर्मचाऱ्यांची तब्बल १२५ कोटींची देणी थकीत आहेत. असे असताना कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्याऐवजी आता प्रशासनाने टीसींना दंडवसुलीचे नवे फर्मान काढले आहे. महिन्याला १५ प्रवाशांकडून दंडवसुलीचे परिपत्रक असताना आता दिवसाला २० प्रवाशांकडून दंडवसुली करण्याचे आदेश प्रशासनाने टीसींना दिले आहेत. परंतु, टीसींनी हे आदेश धुडाकावून लावले आहेत.
ठाणे परिवहनच्या ताफ्यात आजघडीला ३१३ बस आहेत. या बसमधून सुमारे सव्वादोन लाख प्रवासी रोज प्रवास करीत आहेत. परिवहनचे ६५ मार्ग असून यातील काही मार्ग अपुऱ्या बसमुळे बंद करण्यात आले आहेत.
ठाणे ते मुलुंड, बोरिवली, खिडकाळी, मुंबई, नारपोली अशा विविध मार्गांवर या बस धावत आहेत. परंतु, काही मार्गांवरील बस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गांवर तासाला एका बसच्या दोनच फेऱ्या होत आहेत. याशिवाय, परिवहनच्या कर्मचाऱ्यांची पाचव्या, सहाव्या वेतन आयोगापोटी आणि इतर थकबाकी मिळून तब्बल १२५ कोटींची देणी शिल्लक आहेत. तसेच कर्मचाऱ्यांचा डीए, एलटीए, मेडिकल, रोजगार, शैक्षणिक भत्ता आदी भत्तेदेखील परिवहनने बंद केले आहेत.
त्यात नव्या २०० बसचा अद्याप पत्ता नाही. त्यामुळे परिवहनच्या उत्पन्नालादेखील कात्री बसली आहे. अशी परिस्थिती असताना नव्या बस ताफ्यात दाखल करून उत्पन्न वाढविणे अपेक्षित आहे.
तसे न करता मेटाकुटीला आलेल्या कर्मचाऱ्यांनाच परिवहनने वेठीला धरले आहे. त्यानुसार, ३९ टीसींना सध्या नवे फर्मान काढले आहे. यामध्ये रोज २० प्रवाशांकडून दंडवसुली करणे, रोज पाच वाहकांची कॅश तपासणे आणि एका तासात विविध मार्गांवरील ४ बसची तपासणी करणे. यामध्ये बसमध्ये जाऊन प्रत्येक प्रवाशाचे तिकीट तपासण्यात येणार आहे. परंतु, सध्या परिवहनच्या ताफ्यात बसची संख्या कमी असल्याने काही मार्गांवर तासालाच बसच्या दोन फेऱ्या होतात. त्यामुळे चार बस कशा तपासायच्या, असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
पूर्वी प्रशासन आणि युनियनमध्ये झालेल्या करारानुसार महिन्याला एका टीसीकडून १५ प्रवाशांचे टार्गेट होते.