‘त्या’ पुराव्यांचा पेन ड्राइव्ह आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा; नालेसफाई भ्रष्टाचाराची चौकशी सुरू; अधिकारी, ठेकेदारांच्या अडचणीत भर
By मनीषा म्हात्रे | Updated: July 19, 2025 08:52 IST2025-07-19T08:52:29+5:302025-07-19T08:52:52+5:30
नालेसफाईच्या नावाखाली प्रत्यक्षात बांधकाम साइटवरील ‘काळा माल’ हा गाळ म्हणून दाखवून लॉग शिट तयार केले जात असल्याचे स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले होते.

‘त्या’ पुराव्यांचा पेन ड्राइव्ह आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा; नालेसफाई भ्रष्टाचाराची चौकशी सुरू; अधिकारी, ठेकेदारांच्या अडचणीत भर
- मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नालेसफाईतील भ्रष्टाचाराला ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशनमधून वाचा फोडताच याप्रकरणी मुंबई पोलिसांसह विविध तपास यंत्रणांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याच तक्रारीची दखल घेत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीला सुरुवात केली आहे. शुक्रवारी तक्रारदार गणेश घाडगे यांनी भ्रष्टाचाराच्या पुराव्यांचा पेन ड्राइव्ह आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर केला आहे.
नालेसफाईच्या नावाखाली प्रत्यक्षात बांधकाम साइटवरील ‘काळा माल’ हा गाळ म्हणून दाखवून लॉग शिट तयार केले जात असल्याचे स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले होते. पालिका अधिकाऱ्यांचे युजर आयडी आणि पासवर्ड असलेले मोबाइल ठेकेदारांचा माणूस ऑपरेट करताना दिसला. तसेच, लॉग शिटवर एकाच वेळी अधिकाऱ्यांनी सह्या केल्याचे दिसून आले होते. एस वॉर्डमधील १४ ज्युनिअर इंजिनियर, वजन काटा तसेच डम्पिंगच्या जागेवरील अधिकाऱ्यांचे मोबाइल ठेकेदारांचा माणूस ऑपरेट करत असल्याचे दिसले. स्टिंग ऑपरेशननंतर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशाने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून फक्त तीन अभियंत्यांवर ठपका ठेवून ठेकेदार भूपेंद्र पुरोहितला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. विभागीय चौकशीही सुरू आहे. मात्र, अन्य अधिकाऱ्यांवर नेमकी कुणाची कृपा? याचे गूढ अद्याप कायम आहे.
त्यापाठोपाठ आता मिठी नदी घोटाळ्याचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेनेही या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केल्याने भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. टेम्पोमालक तसेच समाजसेवक गणेश घाडगे यांनी मुंबई पोलिसांसह आर्थिक गुन्हे शाखेकडे याप्रकरणी तक्रार दिली होती.
आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी त्यांना पुराव्यांसह बोलावले. त्यानुसार, घाडगे यांनी सकाळी ११:०० वाजता कार्यालयात सर्व पुरावे सादर केले आहेत.
बनावट लॉग शिट वापरले
मिठी नदी घोटाळ्यातील आरोपी भूपेंद्र पुरोहितकडेच एस वॉर्डच्या नालेसफाईचे कंत्राट होते. मिठी नदीप्रमाणे नालेसफाईत अशाच प्रकारे बनावट लॉग शिट तसेच कागदपत्रांचा वापर करण्यात आला आहे.
हे सर्व संबंधित पुरावे, व्हिडीओ - ऑडिओ रेकॉर्डिंग, लॉग शिट, कॉल रेकॉर्डिंग आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर करण्यात आले आहेत.
या घोटाळ्याची व्याप्ती एस वॉर्डपुरती मर्यादित नसून, मुंबईतील सर्वच वॉर्डमध्ये कमी - जास्त प्रमाणात पसरलेली आहे. त्यामुळे याचा सखोल तपास होणे गरजेचे असल्याचेही घाडगे यांनी सांगितले.