Join us

'दीनानाथ'चे भाडे भरणे निर्मात्यांसाठी ठरतेय त्रासदायक; सोयीसुविधांमध्ये सुधारणा झाल्या, पण इतर कामांचे काय?

By संजय घावरे | Updated: March 9, 2024 17:39 IST

पश्चिम उपनगरातील कलेचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या विले पार्लेतील मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये मागील काही दिवसांमध्ये बरीच सुधारणा झाली आहे.

संजय घावरे, मुंबई : पश्चिम उपनगरातील कलेचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या विले पार्लेतील मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये मागील काही दिवसांमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. नाट्यगृह व्यवस्थापन सोयीसुविधांना प्राधान्य देत असले तरी नाट्यगृहाचे भाडे महानगर पालिकेच्या ऑफिसमध्ये भरणे नाट्य निर्मात्यांना त्रासदायक ठरत आहे.

विले पार्लेसह आजूबाजूच्या विभागांतील रसिकांचे मनोरंजन करणारे दीनानाथ नाट्यगृह हळूहळू समस्यांच्या विळख्यातून मुक्त होत आहे. इथे नाट्यप्रयोग चांगला रंगतो आणि इथल्या चाणाक्ष प्रेक्षकांनी दिलेली दाद खूप महत्त्वाची असल्याचे रंगकर्मींचे म्हणणे असल्याने या नाट्यगृहाला खूप महत्त्व आहे. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर इथल्या बऱ्याच समस्या दूर करण्यात व्यवस्थापनाला यश आले आहे. वारंवार खर्च करून का होईना, पण मूलभूत गरज असलेले स्वच्छतागृह सुधारण्यात आले आहे. कलाकारांच्या ग्रीन रुम्ससोबतच सभागृहे आणि स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छता राखली जात आहे. 

नाट्यगृहाच्या आवारातील परिसरही कचरामुक्त ठेवला जात आहे, पण या नाट्यगृहात नाटक किंवा कोणताही कार्यक्रम करायचा असल्यास भाडे आणि अनामत रक्कम भरण्यासाठी नाट्य निर्माते तसेच आयोजकांना मनपा वॅार्ड आॅफिसमध्ये धाव घ्यावी लागते. महाराष्ट्रात कुठेही नाट्यगृहांमध्येच भाडे स्वीकारले जात असताना दिनानाथमध्ये ते का घेतले जात नाही? असा नाट्य निर्मात्यांचा सवाल आहे. दिनानाथप्रमाणेच बोरिवलीतील प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे नाट्यगृहही मनपाचेच आहे, पण नाट्यगृहाचे भाडे आणि डिपॅाझिट तिथेच स्वीकारले जाते. असे असताना दीनानाथ नाट्यगृहालाच हा नियम का? हा निर्मात्यांचा प्रश्नही अद्याप अनुत्तरीत आहे. यावर अष्टविनायक या निर्मिती संस्थेचे नाट्य निर्माते दिलीप जाधव 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, दीनानाथ नाट्यगृहाचे भाडे 'के' वॅार्डमध्ये भरावे लागते. शनिवार-रविवारी प्रयोग असल्यास चार-पाच प्रयोगांची लाख-दीड लाख रुपये रक्कम नेऊन भरणे खूप रिस्की वाटते. त्यापेक्षा नाट्यगृहातच काऊंटर उघडून एक माणूस नेमल्यास काम सोपे होईल. मनपाची इतर कामेही तिथेच होतील आणि स्थानिकांनाही ते सोयीचे ठरेल. यावर आजपर्यंत खूप वेळा बोललो, पण प्रशासनाला जाग येत नसल्याचेही ते म्हणाले.- किशोर गांधी (उपायुक्त, उद्याने)

आम्ही दिलेले चलान नाट्य निर्मात्यांना आॅनलाईन किंवा वॅार्ड आॅफिसमध्येही भरता येते, पण बरेच निर्माते वॅार्ड आॅफिसमध्ये चलान भरण्याचा पर्याय निवडतात. नाट्यगृहात भाडे स्वीकारायचे झाल्यास तिथे महिनाभर एक क्लार्क नेमून त्यावर केवळ नाट्यगृहाचे भाडे स्वीकारण्यासाठी खर्च करणे प्रशासनाला आर्थिकदृष्ट्या खर्चिक ठरेल.- राजू तुलालवार (उपाध्यक्ष - बालरंगभूमी, नाट्यनिर्माते)

दिनानाथ नाटयगृहामधील प्रशासकीय पातळीवरील काही कामांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. नाटयगृहात भाडे स्वीकारले जात नसल्याने निर्मिती संस्थेच्या एका व्यक्तीची विनाकारण धावाधाव होते. त्याऐवजी दिनानाथमध्येच भाडे व डिपॅाझिट जमा करण्याची सोय केल्यास मनुष्यबळ वाचेल. नाट्य निर्मात्यांची बऱ्याच वर्षांपासूनची हि मागणी अद्याप प्रलंबित आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

चलान भरा, पावती दाखवा...

दिनानाथ नाट्यगृहामध्ये कोणताही कार्यक्रम किंवा नाटक करायचे असल्यास अगोदर तिथून चलान घ्यावे लागते. चलान भरून भाडे आणि अनामत रक्कम कोणत्याही मनपा वॅार्ड ऑफिसमध्ये जमा करावी लागते. त्याची पावती दिनानाथमध्ये दाखवल्यानंतर इथे कार्यक्रम-नाटक करण्याचा मार्ग मोकळा होतो. 

टॅग्स :मुंबईनाटक