Join us
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल वेळेत भरा, न भरल्यास जोडणी तोडण्याची नोटीस आल्यावर काय करावे? जाणून घ्या... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 09:58 IST

वीज जोडणी तोडण्याचा नोटीस कालावधी संपल्यानंतर थकित रकमेच्या वसुलीसाठी ग्राहकाकडे प्रत्यक्ष पाठपुरावा केला जातो.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ग्राहक बिलाच्या तारखेपासून अनुक्रमे १५ दिवस आणि २१ दिवसांच्या देय तारखेचा लाभ घेतात. देय तारखेनंतर आणि वीज कायदा -२००२३ च्या कलम ५६ नुसार ग्राहकांना वीज जोडणी तोडण्याची नोटीस जारी केली जाते. 

ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी १५ दिवसांचा नोटीस कालावधी दिला जातो. त्यामुळे एकूण ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी ३६ दिवसांचा कालावधी मिळतो. वीज जोडणी तोडण्याचा नोटीस कालावधी संपल्यानंतर थकित रकमेच्या वसुलीसाठी ग्राहकाकडे प्रत्यक्ष पाठपुरावा केला जातो. तर अधिक रक्कम थकीत असलेल्या प्रकरणांची वीज जोडणी खंडित केली जाते, अशी माहिती वीज कंपन्यांकडून देण्यात आली.

ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल नियमित भरावे. प्रामाणिकपणे विजेचा वापर करावा. सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना दैनंदिन कामामध्ये सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण भांडूप परिमंडलातर्फे ग्राहकांना करण्यात आले आहे.

गेल्या आर्थिक वर्षात थकीत वीज बिलाची रक्कम २३.१९ कोटी रुपये होती. दहिसर, मानखुर्द, कुर्ला, गोवंडी, वांद्रे येथील ग्राहकांकडून सर्वाधिक थकीत रक्कम प्रलंबित असून, हा आकडा एकूण थकीत रकमेच्या ६१ टक्के इतका आहे. या प्रक्रियेमध्ये ग्राहकांना एसएमएस आणि टेली कॉलिंगद्वारे थकबाकी रक्कम भरा, असे सांगितले जाते. पाठपुराव्याद्वारे ग्राहकांकडून ३५ टक्के थकीत रक्कम वसूल केली जाते. गेल्या आर्थिक वर्ष २०२३ मध्ये जवळपास ४५ हजार वीज जोडण्या खंडित करण्यात आल्या. ज्याचे प्रमाण एकूण ग्राहकांच्या ६.२ टक्के आहे.                                      - टाटा पॉवर

टप्प्याटप्प्याने वीजबिल भरण्याचा पर्याय ग्राहकांना वीजबिल टप्प्याटप्प्याने भरण्याची पद्धत कोरोनादरम्यान देण्यात आली होती. ग्राहकांना टप्प्याटप्प्याने भरण्याची पद्धत त्यांच्या विनंतीनुसार प्रदान केली जाते. ग्राहक त्यांचे वीजबिल कशा पद्धतीने भरणार आहे आणि ग्राहकांची थकबाकी भरण्यासाठीची आर्थिक स्थिती या आधारे विनंतीचे मूल्यमापन केले जाते. यावर ग्राहकाला टप्प्याटप्प्याने वीजबिल भरण्याचा पर्याय दिला जातो.

स्मार्ट मीटर काय करणार ?नेमका वीज वापर लक्षात आल्याने ग्राहक वीज बचत करण्याबाबत अधिक जागरूक राहू शकतो. स्मार्ट मीटरमुळे वीजबिल व्यवस्थेत बदल होत आहेत.

वीज कंपन्यांची थकबाकी बिलांबाबत ग्राहकांच्या तक्रारी कमी झाल्यास त्याचा फायदा ग्राहकांसोबतच वीज कंपन्यांनाही होणार आहे. ग्राहकांना वेळेत बिल भरण्याची सवय लागून, वीज कंपन्यांची थकबाकी कमी होण्यासाठीही स्मार्ट मीटरची मदत होणार आहे.

टॅग्स :वीज