Join us

तीन टप्प्यांत भरा घराची किंमत; म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे सुविधा

By सचिन लुंगसे | Updated: September 30, 2022 19:31 IST

सदनिकेची १० टक्के रक्कम भरल्यानंतर उर्वरित ९० टक्के रक्कम गृहकर्ज स्वरूपात उपलब्ध होण्यासाठी मंडळ ना-हरकत प्रमाणपत्र देणार          

मुंबई : म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे सन २०१८ व त्यापूर्वी काढलेल्या सदनिका सोडतींमधील संकेत क्रमांक २७६ मौजे बाळकुम-ठाणे या गृहनिर्माण योजनेतील १९७ लाभार्थ्यांना सदनिकेची एकूण किंमत तीन टप्प्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. 

या सुविधेंतर्गत सदर योजनेतील लाभार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात सदनिकेच्या एकूण किंमतीच्या २५ टक्के रक्कम ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत, दुसऱ्या टप्प्यात ५० टक्के रक्कम ३१ जानेवारी २०२३ पर्यंत भरायची आहे. तसेच तिसऱ्या टप्प्याअंतर्गत उर्वरित २५ टक्के रक्कम भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांत वितरणपत्रामधील अटी शर्तींच्या अधिन राहून भरणे लाभार्थ्यांना बंधनकारक आहे.           

सदर योजनेतील लाभार्थ्यांनी मंडळाकडे केलेल्या मागणीनुसार व  सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा सुलभ, मुदतीत होण्यासाठी मौजे बाळकुम-ठाणे, संकेत क्रमांक २७६ मधील विजेते व देकार पत्र प्राप्त विजेत्यांनी सदनिकेच्या एकूण किंमतीच्या १० टक्के रकमेचा भरणा केल्यानंतर कोंकण मंडळामार्फत सदनिकेची उर्वरित ९० टक्के रक्कम बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून गृह कर्ज स्वरूपात उपलब्ध होण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

सोडतीच्या नियमानुसार देकार पत्र मिळाल्यापासुन ४५ दिवसांत  सदनिकेच्या एकूण किंमतीच्या १० टक्के रक्कम व त्यानंतर ६० दिवसांत ९० टक्के रक्कम भरून घेतली जाते. मात्र, मौजे बाळकूम-ठाणे गृहनिर्माण योजनेतील लाभार्थ्यांसाठी सदर नियम शिथिल करण्यात आले आहेत. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन कोंकण मंडळातर्फे करण्यात आले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :म्हाडा