लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्टेशनवर टीसींकडून विदाउट तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २५० रुपयांचा दंड आकारण्याऐवजी केवळ १०० रुपये घेऊन सोडण्यात येत असल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास ‘लोकमत’च्या प्रतिनिधीच्या निदर्शनास आला. ही बाब वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक अभय सिंह यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर हरिप्रसाद या टीसीस याबाबत सविस्तर खुलासा देण्याच्या सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली, तसेच स्पष्टीकरणानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले.
फुकट्या आणि चुकीचे तिकीट असलेल्या रेल्वे प्रवाशांकडून नियमानुसार २५० रुपयांचा दंड, तसेच प्रवास केलेल्या अंतराच्या तिकिटाचे पैसे आकारण्यात येतात; परंतु मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात टीसीकडून केवळ ५० ते १०० रुपये घेऊन त्याची पावती न देता प्रवाशांना सोडण्यात येत होते.
दोन प्रवाशांबाबत घडलेला हा प्रकार पाहिल्यानंतर ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने हरिप्रसाद याला त्याबद्दल विचारणा केली असता त्याने थातूरमातूर उत्तरे दिली. चर्चगेट स्टेशनच्या मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील आरपीएफ कार्यालयाजवळ प्रवाशांना नेऊन काही टीसींकडून अशाच प्रकारे पैसे घेतले जात असल्याचे काही प्रवाशांचे म्हणणे आहे.