Join us  

केबल ग्राहकांना सविस्तर बिल द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 3:33 AM

संडे अँकर । ट्राय : नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करा; पाच एमएसओना निर्देश

मुंबई : दूरसंचार नियामक आयोगाकडे (ट्राय) देशभरातील विविध ग्राहकांच्या आलेल्या तक्रारींची दखल घेत ट्रायने पाच मल्टी सिस्टीम आॅपरेटर (एमएसओ)ना नवीन नियमावलीची सात दिवसांत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. डेन नेटवर्क लिमिटेड, इन्डसइंड मीडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन्स लिमिटेड, सिटी नेटवर्क लिमिटेड, हॅथवे डिजिटल प्रा.लि., जीटीपीएल हॅथवे लि. या पाच एमएसओना हे निर्देश देण्यात आले आहेत.

ग्राहकांकडून सातत्याने मागणी केल्यानंतरही त्यांना सविस्तर बिल दिले जात नाही, काही जण स्वत:चे कॅश मेमो बिल देतात, कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या कन्झ्युमर पोर्टलवर पुरेशी माहिती नसणे, जीएसटी अकाउंट नसताना ग्राहकांकडून जीएसटी दराने बिल घेऊन प्रत्यक्षात जीएसटी न भरणे, ग्राहकांना काही तक्रार करायची असल्यास त्यासाठी सुविधा उपलब्ध करून न देणे, ग्राहकांना आपला प्लॅन अद्ययावत करण्याची सुविधा न पुरवणे, इंटरअ‍ॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम (आयव्हीआरएस) प्रणालीमध्ये तक्रार करण्याची सुविधा पुरवण्यात आलेली नाही, वेबसाइटवर पुरेशी माहिती नसणे व तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध नसणे, अशा प्रकारच्या विविध तक्रारी ट्रायकडे ग्राहकांनी नोंदवल्या होत्या. चौकशी केल्यानंतर या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्याने ट्रायने संबंधित एमएसओना कारभार सुधारण्याचे तसेच नवीन नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. ट्रायचे सल्लागार अनिलकुमार भारद्वाज यांच्या स्वाक्षरीने यासंदर्भात नोटीस संबंधितांना पाठवण्यात आली आहे.ट्रायने नवीन नियमावली लागू करताना ग्राहकांना आवडीच्या वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल व पूर्वीच्या तुलनेत कमी दरात वाहिन्या पाहता येतील, असा दावा केला होता. प्रत्यक्षात एमएसओकडून होणाऱ्या मुस्कटदाबीमुळे ग्राहकांना आवडीच्या वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. ज्या वाहिन्यांना जास्त प्रेक्षकवर्ग नसतो अशा वाहिन्यांचा समावेश बुके (समूह वाहिन्या)मध्ये करून ग्राहकांना बळजबरीने अशा वाहिन्या पाहण्यास भाग पाडून त्यासाठी शुल्क भरावे लागत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

ट्रायने जारी केलेल्या नियमावलींची प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना मात्र एमएसओकडून मनमानी केली जात असल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या संतापाची व तक्रारींची दखल घेऊन ट्रायने आता एमएसओचे कान उपटले आहेत. किमान या निर्देशांची तरी प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा ग्राहकांमधून व्यक्त केली जात आहे.योग्य निर्णयट्रायने लागू केलेली नियमावली चांगली असली तरी त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्याने गोंधळ निर्माण झाला होता. याबाबतच्या तक्रारींची दखल घेत आता ट्रायने दिलेल्या निर्देशांचे स्वागत आहे. ग्राहकांना न्याय देण्यासाठी ट्रायने सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे.- अ‍ॅड. अनुप वणसे

टॅग्स :ट्रायमुंबईटेलिव्हिजन