Join us
Daily Top 2Weekly Top 5

केबलचे ऑनलाइन पेमेंट करा, अन्यथा केवळ निशुल्क वाहिन्या बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 16:37 IST

महाराष्ट्र केबल ऑपरेटर फाऊंडेशनचा निर्णय...

 

मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे केबल सेवेवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्राहकांकडून केबल व्यावसायिकांना केबलचे शुल्क मिळत नसल्याने केबल सेवा बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र केबल ऑपरेटर फाऊंडेशनने ग्राहकांना काही पर्याय दिले आहेत. 

कोरोनामुळे अनेक वसाहतींमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे केबल चालकांना वेळेवर शुल्क मिळत नाही. परिणामी त्यांना एमएसओ ना द्यावे लागणारे पैसे देणे अशक्य झाले आहे. यामुळे ग्राहकांनी शुल्क भरण्यासाठी ऑनलाइन पेमेंट चा पर्याय स्वीकारावा, किंवा सध्या फ्री टु एअर ( निशुल्क)  वाहिन्या पाहाव्यात किंवा ग्राहकांनी त्यांच्या आवडीच्या वाहिन्यांची यादी केबल चालकाकडे द्यावी त्यांना त्या वाहिन्या उपलब्ध करुन देण्यात येतील .ग्राहकांनी लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर दोन किंवा तीन महिन्यात त्याचे शुल्क द्यावे मात्र त्यासाठी अतिरिक्त शुल्क म्हणून तीस रुपये दिले जावेत, असे पर्याय फाऊंडेशन ने ग्राहकांना दिले आहेत. ग्राहकांना यापैकी कोणता पर्याय सोयीचा वाटेल , तो पर्याय स्वीकारावा असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी केले आहे. 

लॉकडाऊन मुळे केबल व्यवसायात कार्यरत असलेली मुले कामावर कमी प्रमाणात येत आहेत. जी मुले कामावर येत आहेत त्यांना अनेक वसाहतींमध्ये प्रवेश नाकारला जात आहे. त्यामुळे शुल्क जमा करणे अशक्य झाले आहे. सुमारे साठ ते सत्तर टक्के ग्राहक ऑनलाइन पेमेंट करु शकतात तर उर्वरीत तीस ते चाळीस टक्के ग्राहकांना ऑनलाईनचा पर्याय वापरणे शक्य होत नाही.

सध्या लॉकडाऊन मुळे नवीन मालिकांचे चित्रिकरण ठप्प झालेले असल्याने सशुल्क वाहिन्यांवर देखील जुन्या मालिकांचे पुनर्प्रसारण केले जात आहे. अनेक वृत्तवाहिन्या निशुल्क उपलब्ध आहेत. क्रीडा विषयक वाहिन्यांवर देखील जुने सामने दाखवले जात आहेत त्यामुळे ग्राहकांना निशुल्क वाहिन्या पाहणे देखील श्रेयस्कर ठरेल असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या