Join us  

नेते सोडून चालल्यामुळेच पवारांची चिडचिड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 2:41 AM

शरद पवार यांचा असा स्वभाव कधीच नव्हता. केवळ नातेवाईक पक्ष सोडून जात आहेत

दिनकर रायकर 

मुंबई : शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकार परिषदेत केलेल्या चिडचिडीमुळे त्यांच्या वागण्याविषयी अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. गेल्या ५० वर्षाच्या कारकीर्दीमध्ये सतत चढती कमान ठेवलेल्या पवार यांना २०१४ नंतर पराभवाचे धक्के बसू लागले. त्यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले. कार्यकर्ते सोबत आहेत, पण वर्षानुवर्षे सोबत असलेले नेते मात्र सोडून चालले आहेत, हे शल्य त्यांच्या चिडचिडीतून बाहेर आले असावे.

शरद पवार यांचा असा स्वभाव कधीच नव्हता. केवळ नातेवाईक पक्ष सोडून जात आहेत या प्रश्नावर त्यांनी एवढे चिडण्याचे काही कारण नव्हते. जे कोणी सोडून जात आहेत, त्यात त्यांचे नातेवाईक आहेत हे तेही कबूल करतात. राजकारणात सत्ता महत्वाची असते, नातेसंबंध नाहीत, असे उत्तर देऊन नेहमीच्या मुत्सद्दीपणाने पवार यांना तो प्रश्न सहज टोलवता आला असता. ज्या नातेवाईकांच्या उल्लेखाने पत्रकार परिषदेत वाद झाला, ते नातेवाईक शनिवारी भाजपमध्ये गेले. ही घोषणाही त्याच नातेवाईकांनी केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी म्हणजे डॉ. पद्मसिंह पाटील यांची सख्खी बहीण. थेट घरातील व्यक्ती भाजपमध्ये जात असेल, तर पत्रकार याची कारणे विचारणाच. त्याचे चिडून उत्तर देणे पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याकडून अपेक्षित नव्हते.

काही नेते स्वत:वरील गुन्हे, आर्थिक अडचणी यातून मार्ग काढण्यासाठी भाजप व शिवसेनेत जात आहेत. त्यातील काहींनी त्यांच्या अडचणी आपल्याला सांगून भाजपचा मार्ग धरल्याचे स्वत: पवार यांनीच काही दिवसांपूर्वी जाहीरपणे सांगितले होते. राष्टÑवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पतीवरील केसमुळे भाजप प्रवेश करावा लागत असल्याचेही त्यांनी आपल्याला सांगितल्याचे पवार म्हणाले होते. हीच गोष्ट त्यांचे एकेकाळचे विश्वासू सचिन अहिर यांच्याबाबतीतही. शेवटी सत्तेचे हे राजकारण पवारांना नवीन नाही. पुलोद सरकारच्या शेवटच्या काळातही पवार पत्रकारांना सांगायचे की, मला जनसंघ, समाजवादी, शेकाप, डावे यांच्या आमदारांची चिंता नाही, पण भीती आहे काँग्रेसच्या आमदारांचीच! नेमके झालेही तसेच. त्यावेळी काँग्रेसचेच आमदार पवारांना सोडून गेले होते. त्याच्या नंतर आमदारांची संख्या ५२ वरुन ६ आली आणि त्यांचे विरोधी पक्ष नेतेपद गेले. तरीही त्यांची चिडचिड झाली नव्हती.खरे तर पवार हे पत्रकारांचे कायम आवडते नेते राहिले आहेत. त्यांच्या एका फोनवर पत्रकारांनी त्यांच्याकडे धाव घ्यावी असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. सार्वजनिक जीवनात चिडण्यात अर्थ नसतो, हे समजण्याइतका समंजसपणा त्यांच्याकडे निश्चित आहे. तो त्यांनी वेळोवेळी अधोरेखित केला आहे. त्यांच्या वागण्याचे धडे आजवर अनेक नव्या राजकारण्यांनी अंगिकारले आहेत. त्यामुळेच त्यांचे हे वागणे राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे.

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसराजकारणविधानसभा