Join us  

मुंबापुरीत उपचारासाठी येणाऱ्या कर्करुग्णांना भेटला ‘देवदूत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 4:33 AM

देशभरातून येणाऱ्या रुग्णांची सेवा

- स्नेहा मोरे मुंबई : देशाच्या कानाकोपऱ्यातून कर्करोगाच्या उपचारांसाठी मुंबापुरीत दाखल होणारे रुग्ण शहराविषयी, लोकांविषयी अनभिज्ञ असतात. बºयाचदा ‘कर्करोग’ या शब्दानंतर रुग्ण व कुटुंबीयांना मानसिक धक्का पोहोचलेला असतो. अशा स्थितीत उपचारांसाठी मुंबईत आल्यानंतर मार्ग शोधताना लाखो रुग्णांसाठी दादर येथील श्री संत गाडगे महाराज मिशन धर्मशाळा वरदान ठरत आहे. गेली ३५ हून अधिक वर्षे देशभरातील कर्करुग्णांसाठी धर्मशाळेचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख हे ‘देवदूत’ होऊन काम करत आहेत.

श्री संत गाडगे महाराज मिशन धर्मशाळेत भारतासह नेपाळ, बांगलादेश, झारखंड, छत्तीसगढमधूनही येथे रुग्ण येतात. कर्करुग्णांच्या निवासाची सोय करण्यासह येथे रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीय व नातेवाइकांची मोफत जेवणाची व्यवस्थादेखील करण्यात येते. रुग्णांची टाटा रुग्णालयात ने-आण करण्यासाठी एक वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे, याद्वारे नि:शुल्क सेवा या रुग्णांना देण्यात येते. याविषयी, प्रशांत देशमुख यांनी सांगितले, धर्मशाळेची आर्थिक गरज भागविताना समाजातील अनेक दानशूर व्यक्तींची मोलाची मदत होत असते. या धर्मशाळेत रोज ३० ते ४० लोक येत असतात.

अशा वेळी या लोकांची राहण्याची, जेवणाची सोय दानशूर व्यक्तींनी केलेल्या देणगीतून होत असते. संस्थेला शासकीय अनुदान नसले तरी शासन सकारात्मक आहे. एखादी जागा धर्मशाळेसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राज्य शासनाकडे पत्राद्वारे केली आहे. शासनाच्या अनेक योजनांमधून राज्य शासन सहयोग करत असते.

संत गाडगेबाबा यांनी ‘भुकेल्याला जेवण आणि तहानलेल्याला पाणी’ हा संदेश सर्वांना दिला आहे. आम्ही त्यांचे तंतोतंत पालन करत आहोत. गाडगेबाबा मिशन ट्रस्टमध्ये रोज ९०० ते १००० लोक अन्नदानाचा लाभ घेतात, अशी माहिती देशमुख यांनी दिली. ते म्हणाले की, या कार्यात पत्नीचेही अमूल्य योगदान आहे. माझे कुटुंबीयसुद्धा या धर्मशाळेत रुग्णांसह राहतात.

बाल कर्करुग्णांसह माझी अपत्ये खेळतात. कर्करोगाविषयी आजही समाजात अनेक गैरसमज आहेत, अजूनही कर्करोगाचे निदान झाल्यास समाजातील काही घटकांत वाळीत टाकले जाते. त्यामुळे यातून प्रेरणा घेऊन कर्करुग्णांचा मानसिक, भावनिक आधार होण्यासाठी अनेकांनी पुढाकार घ्यावा, अशी कृतज्ञ भावना आहे.

‘विशेष बेस्ट बस सेवा उपलब्ध करून द्यावी’

धर्मशाळा ते टाटा मेमोरियल या मार्गावरील विशेष बेस्ट बसची या रुग्णांसाठी सेवा द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. देगणीदारांकडून मिळणाºया देणगीतून रुग्णांना शक्य तेवढी आर्थिक मदत करण्यात येत आहे. मात्र रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी विशेष बेस्ट बस सेवा मिळाल्यास त्यांची ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने पुढाकारघ्यावा, अशी मागणी देशमुख यांनी केली.

सध्या केवळ एकच गाडी असल्याने मर्यादित रुग्णांची ने-आण करता येते. मात्र बेस्टच्या ताफ्यात नव्याने सुरू झालेल्या लहान बेस्ट बस या सेवेसाठी देण्यात आल्यास कर्करुग्णांना लाभदायी ठरेल असेही देशमुख म्हणाले.

 

टॅग्स :कर्करोगमुंबईमहाराष्ट्रभारत