Join us

चिंता, धावपळ... कस्तुरबा गॅस गळतीनंतर रुग्णांची प्रकृती स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 09:01 IST

गॅसगळतीच्या घटनेनंतर रुग्णालयाच्या आवारात सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांच्या काळजीने आप्तेष्टांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.

मुंबई :  गॅस गळती होताच रुग्णालय प्रशासनाने इमारत खाली करून कोरोना रुग्णांना इतर विभागात हलवल्याने सुदैवाने दुर्घटना टळल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. या घटनेनंतर सामान्य स्थितीतील रुग्णांना पायी जावे लागले, तर काहींना स्ट्रेचरवरून दुसरीकडे हलवण्यात आले.गॅसगळतीच्या घटनेनंतर रुग्णालयाच्या आवारात सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांच्या काळजीने आप्तेष्टांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णालय प्रशासनाने त्वरित हालचाल करुन रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयाच्या अन्य इमारतीत दाखल केले. कस्तुरबा रुग्णालयात शनिवारी घटनेनंतर कोरोनाबाधित रुग्णांना अन्य इमारतीत हलवताना रुग्णालय प्रशासनाची काहीशी तारांबळ झालेली दिसली.सकाळी ११ वाजून ३४ मिनिटाने रुग्णालयाच्या आवारातील अचानक तेथील एलपीजी वायूची गळती झाली. त्यावेळी रुग्णालयात एकच खळबळ उडाली. या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यामध्ये काही रुग्ण सामान्य स्थितीत होते, तर काही जणांना सलाईन लावलेले होते. अशा वेळी ही घटना घडल्यावर रुग्णालय प्रशासन तात्काळ सक्रिय झाले आणि त्यांनी त्या इमारतीत दाखल केलेल्या रुग्णांना तात्काळ दुसऱ्या इमारतीत हलवले. इमारतीमधील ५८ रुग्णांना इतर विभागात हलविण्यात आले आहे, त्यातील २० रुग्ण कोरोनाबाधित आहेत.याविषयी, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, गॅस सगळतीच्या घटनेत रुग्णांना जीवीत हानी झालेली नाही, सुदैवाने सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यातील चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.