Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयसीयू बेडअभावी रुग्णाचा गेला जीव; पत्नीचा कूपर रुग्णालयावर आरोप, लढा देण्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 05:46 IST

सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होता व त्यांचा रक्तदाब कमी होता, अशा परिस्थितीत कूपर रुग्णालयाच्या जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते

मुंबई - कूपर रुग्णालयात अत्यवस्थ स्थितीत उपचारांसाठी एका रुग्णाला दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर बनल्याने त्याला आयसीयूत दाखल करण्याची गरज होती. परंतु, आयसीयूत बेड उपलब्ध असतानाही दिला गेला नाही. परिणामी, त्याचा मृत्यू झाला असा आरोप मृत रुग्णाच्या पत्नीने केला आहे. या प्रकरणी कायदेशीर लढा देण्याचा निर्धारही तिने  केला आहे. 

कैलाश सिंग (३८) यांच्यावर नालासोपारा येथील रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. त्यांना पुढील उपचारांसाठी २५ एप्रिलला दुपारी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होता व त्यांचा रक्तदाब कमी होता, अशा परिस्थितीत कूपर रुग्णालयाच्या जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली. मात्र, रुग्णालय प्रशासनाने आयसीयू बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले.

रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्य़ाची तयारी कुटुंबीयांनी दर्शवली असता, ट्रान्सफर करणे धोकादायक असल्याचे सांगून त्यांना वॉर्डामध्येच ठेवण्यात आले. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सिंग यांच्या पत्नीने व मित्रांनी आयसीयूमध्ये बेड उपलब्ध असल्याचे पाहिले. त्यामुळे त्यांनी कैलाश यांना आयसीयूमध्ये नेण्याची मागणी केली. मात्र, त्यांना तिथे नेण्यात आले नाही. रात्री ११ वाजता कैलाश यांचा जनरल वॉर्डामध्ये मृत्यू झाला. 

कुटुंबातील एकमेव कमावतेकैलाश हे साऊंड इंजिनिअर म्हणून कार्यरत होते आणि कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले, (१२ वर्षांचा मुलगा व ७ वर्षांची मुलगी) असा परिवार आहे. सिंग यांची पत्नी पूजा सिंग यांनी सांगितले की, “डॉक्टरांनी स्वतः आयसीयू बेडची गरज असल्याचे सांगितले होते. मात्र शेवटपर्यंत आयसीयू मिळाला नाही. अंत्यविधी व अस्थी विसर्जनानंतर या प्रकरणी कायदेशीर लढा देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. न्यायासाठी लढा देणार असून, कुणालाही सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनातर्फे कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : ICU bed denial leads to death; wife alleges negligence.

Web Summary : Kailash Singh died at Cooper Hospital after allegedly being denied an ICU bed despite availability. His wife alleges negligence and vows legal action, claiming doctors stated ICU necessity. He leaves behind his wife and two young children.
टॅग्स :हॉस्पिटल