वसई मॅरेथॉनचा मार्ग बदलला
By Admin | Updated: November 21, 2015 00:30 IST2015-11-21T00:30:00+5:302015-11-21T00:30:00+5:30
मॅरेथॉन स्पर्धेला रोखण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी परिस्थितीचा आढावा घेतला व स्पर्धेचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

वसई मॅरेथॉनचा मार्ग बदलला
वसई : मॅरेथॉन स्पर्धेला रोखण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी परिस्थितीचा आढावा घेतला व स्पर्धेचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी परिस्थितीची पाहणी केली व त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ग्रामीण भागातून जाणारा स्पर्धेचा मार्ग बदलण्याचे जाहीर केले. आता ही स्पर्धा ग्रामीण भागात गावांतून जाणार नाही. या निर्णयामुळे संघर्षाचे वातावरण निवळेल, अशी अपेक्षा पोलीस व जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
रविवारी होणाऱ्या पाचव्या महापौर मॅरेथॉन स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे. तर, विरोधकांनी ही स्पर्धा रोखण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. विरोधकांनी चर्चेला येण्याच्या महापौरांच्या आवाहनाला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे मनपा आणि पोलीस यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षा संघर्ष उद्भवू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारीचे उपाय योजण्यास प्रारंभ केला आहे.
मॅरेथॉन स्पर्धेचे यंदाचे पाचवे वर्ष असून यंदा या स्पर्धेचा मार्ग ग्रामीण भागातून जात आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी पक्षाच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत ही स्पर्धा गावात अडवण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होत असल्यामुळे सतर्कता वाढली आहे.
गावांचा प्रश्न अद्याप मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असताना सत्ताधारी पक्षांनी जाणूनबुजून स्पर्धेचा मार्ग या गावात नेण्याचा प्रयत्न चालवल्याचा विरोधकांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक या परिसरातील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. या स्पर्धेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीसबळ तैनात करण्यात येणार आहे. स्पर्धेपूर्वी विरोधी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचे पोलिसांचे प्रयत्न आहेत.