फूट मनसेच्या पथ्यावर?

By Admin | Updated: December 28, 2014 01:55 IST2014-12-28T01:55:31+5:302014-12-28T01:55:31+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये पडलेल्या फुटीचा लाभ घेण्यासाठी मनसे सरसावली आहे.

On the path of the MASA? | फूट मनसेच्या पथ्यावर?

फूट मनसेच्या पथ्यावर?

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये पडलेल्या फुटीचा लाभ घेण्यासाठी मनसे सरसावली आहे. विरोधी पक्षनेतेपद पुन्हा एकदा पटकावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून लवकरच मनसेकडून या पदावर दावा केला जाणार आहे.
महापालिकेतील काँग्रेसच्या १५ नगरसेवकांपैकी ११ नगरसेवकांनी गटनेते सचिन पोटे यांचे नेतृत्व मान्य नसल्याचे कारण देत वेगळा गट स्थापन केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या महासभेत या नाराज नगरसेवकांनी पक्षासाठी ठरवून दिलेल्या आसनव्यवस्थेवर न बसता वेगळी चूल मांडल्याचे दिसून आले. सध्या विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसकडे आहे, परंतु या पक्षातील बहुतांश नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केल्याने विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. काँग्रेसला मिळालेल्या विरोधी पक्षनेतेपदाला याआधीच मनसेचे सदस्य व माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांची नाराजी पाहता ‘जे पेरले ते उगवले’ असा टोला हळबे यांनी लगावला आहे.
विश्वनाथ राणे यांनी पक्षातील नगरसेवकांना विश्वासात न घेता सत्ताधाऱ्यांशी संगनमत करून विरोधी पक्षनेतेपद मिळविले होते. त्यामुळे ही नाराजी कधी ना कधी उघड होणार होतीच, याचा प्रत्यय आल्याचे हळबे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपद मनसेकडे खेचण्यासाठी हालचाली सुरू असून सध्या ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने पालिकेतील सद्य:स्थितीची माहिती न्यायालयाला दिली जाणार आहे. यासंदर्भातील माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे गटनेते सुदेश चुडनाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

राष्ट्रवादीचीही धडपड : काँग्रेसमधील फुटीचा लाभ घेण्यासाठी मनसेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचीदेखील धडपड सुरू आहे. त्यांच्याकडूनही या पदावर दावा केला जाणार असल्याचे वृत्त आहे. याला राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक संजय पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
दावा चुकीचा : मनसे आणि राष्ट्रवादी करीत असलेला दावा चुकीचा आहे. मनसेचा विरोधी पक्षनेतेपदाचा वाद न्यायप्रविष्ट आहे. राष्ट्रवादीशी आमची आघाडी असल्याने त्यांनी आमच्याबरोबर चर्चा करावी, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गटनेते सचिन पोटे यांनी दिली आहे.

‘जे पेरले ते उगवले’ : काँग्रेसला मिळालेल्या विरोधी पक्षनेतेपदाला याआधीच माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी आव्हान दिले आहे. ‘जे पेरले ते उगवले’ असा टोला हळबे यांनी लगावला आहे.

Web Title: On the path of the MASA?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.