Join us
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्ट होणार अधिक सुरक्षित, केवळ यूव्ही लाइटद्वारे दिसणाऱ्या वॉटरमार्कचा वापर करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 03:27 IST

सध्या मुंबईतील सुमारे ५ हजार पासपोर्टची छपाई केली जाते. त्याशिवाय पुणे, नागपूर, अहमदाबाद, भोपाळ, चेन्नई, गुवाहाटी, कोलकाता, हैदराबाद या विविध ठिकाणच्या पासपोर्ट कार्यालयात नोंदविण्यात आलेल्या पासपोर्टची छपाईदेखील केली जाते.

खलील गिरकर 

मुंबई : पासपोर्टचा दर्जा सुधारण्यात येत असून, पासपोर्ट सध्यापेक्षा अधिक सुरक्षित बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पासपोर्टच्या डिझाइनमध्ये सुधारणा करण्यात येत असून, तो अधिक सुरक्षित बनविण्यासाठी त्यात सुरक्षेच्या बाबी वाढविण्यात येत आहेत. प्रत्येक पानाचा दर्जा वाढविण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक पानावर असलेले पान क्रमांक वॉटर मार्कने नोंदविण्यात येणार असून, साध्या डोळ्यांनी हा वॉटर मार्क पाहता येणार नाही. केवळ अल्ट्रा व्हायोलेट लाइटद्वारे हा वॉटरमार्क तयार करण्यात येत आहे. या विविध बाबींमुळे पासपोर्टमध्ये बदल करणे कठीण होईल, असा विश्वास मुंबईचे विभागीय पासपोर्ट अधिकारी तुलसीदास शर्मा यांनी व्यक्त केला.सध्या राज्यात नाशिक येथील शासकीय मुद्रणालयात पासपोर्ट तयार केले जातात. त्यानंतर, मुंबईमध्ये त्यावर माहिती छापली जाते. देशातील विविध पासपोर्ट कार्यालयांमध्ये तेथील स्थानिकांच्या पासपोर्टची छपाई केली जाते. मात्र, मुंबई येथे मुंबईसहित देशातील इतर ठिकाणच्या पासपोर्टची छपाई केली जात आहे. त्यासाठी केंद्रीय पासपोर्ट प्रिटिंगसाठी मुंबईची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी दिल्लीत ही सुविधा होती.

सध्या मुंबईतील सुमारे ५ हजार पासपोर्टची छपाई केली जाते. त्याशिवाय पुणे, नागपूर, अहमदाबाद, भोपाळ, चेन्नई, गुवाहाटी, कोलकाता, हैदराबाद या विविध ठिकाणच्या पासपोर्ट कार्यालयात नोंदविण्यात आलेल्या पासपोर्टची छपाईदेखील केली जाते. अशा प्रकारे मुंबईबाहेरील कार्यालयातील दररोज सुमारे ४ ते ५ हजार पासपोर्टची मुंबई पासपोर्ट कार्यालयात छपाई केली जात असल्याची माहिती शर्मा यांनी दिली. २०१८मध्ये अर्ज करून ज्यांना अद्याप पासपोर्ट मिळालेला नाही, त्यांनी त्वरित पासपोर्ट कार्यालयाशी संपर्क साधावा व प्रलंबित कागदपत्रांची पूर्तता करावी, अन्यथा पुढील कालावधीत लवकरच त्यांचे अर्ज दप्तरबंद करण्यात येतील, असा इशारा शर्मा यांनी दिला आहे. 

टॅग्स :पासपोर्टमुंबई