Join us  

तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्यांनाच पासपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 7:06 AM

ज्यांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज असेल, त्यांनीच पासपोर्ट कार्यालयात यावे

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे पासपोर्ट कार्यालयांचे काम मर्यादित करण्यात आले आहे. ज्यांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज असेल, त्यांनीच पासपोर्ट कार्यालयात यावे अन्य अर्जदारांनी १ एप्रिलनंतर यावे, असे आवाहन पासपोर्ट कार्यालयाने केले. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना याची माहिती मिळाली नसल्याने, त्यांना शुक्रवारी पासपोर्ट सेवा केंद्रात जाऊन काम न झाल्याने परत यावे लागले. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.पासपोर्ट कार्यालय सुरू आहेत, असा मोबाइल संदेश शुक्रवारी सकाळी पासपोर्ट कार्यालयाकडून मिळाला. गुरुवारी कॉल सेंटरला फोन केला, तेव्हाही पासपोर्ट कार्यालय सुरू असल्याचे समजले. लोकांना त्रास होत असताना पासपोर्ट कार्यालयाकडून माहिती मिळत नाही. कार्यालयाचे फोन बंद असतात, असा आरोप लोअर परळ येथील कार्यालयाबाहेर थांबलेल्या नागरिकांनी केला.मात्र, अर्जदारांना एसएमएस पाठवून अति तातडीचे किंवा वैद्यकीय आणीबाणीचा प्रसंग असल्यास पासपोर्टसाठी यावे, अन्यथा १ एप्रिलनंतर वेळ घ्यावी, असे कळविल्याचे पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांनी व्हिसा बंद केला आहे. पासपोर्ट तयार करताना बायोमेट्रिक पद्धत वापरली जाते. पासपोर्ट नूतनीकरण, व्हिसासाठी विदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या जास्त असते. कोरोनाचा प्रभाव वाढू नये, म्हणून ही काळजी घेतली आहे. टपाल खात्याच्या कार्यालयातही सुरू असलेली आधार केंद्रे ३१ मार्चपर्यंत बंद आहेत. बायोमेट्रिक पद्धतीने आधार बनविण्यात येत असल्याने ही खबरदारीचा घेतली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसपासपोर्ट