Join us

एसटी बस कुठे आहे? मोबाइलवर ठावठिकाणा कळणार, येत्या महिनाभरात सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 15:54 IST

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ग्वाही

मुंबई: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने तयार केलेल्या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचे लोकेशन मोबाइलवर कळणार आहे. एसटी तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टॅन्डवर येण्याची अचूक वेळ समजणार आहे. हे अॅप्लिकेशन येत्या महिन्याभरात सुरू करण्यात येत असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. एसटी मुख्यालयात महामंडळाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सरनाईक यांनी परिवहन संस्थेच्या ताफ्यातील १५,००० पैकी ३,००० बसमध्ये जीपीएस बसवण्यात अपयशी ठरलेल्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला.

राज्य सरकारने कोविड-१९ साथीच्या आजारापूर्वी त्यांच्या ताफ्यातील बसेसमध्ये जीपीएस बसवण्याचे आणि प्रवाशांना बसेस ट्रॅक करता याव्यात यासाठी अॅप्लिकेशन तयार करण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ऑगस्ट २०१९ मध्ये, तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अॅप्लिकेशन लाँच केले, जे कंपनीला सहा महिन्यांत जनतेसाठी उपलब्ध करून द्यायचे होते; परंतु अद्याप ते काम पूर्ण झाले नसल्याने नवे परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, खासगी कंपनीला दिलेला करार अजूनही सुरू आहे आणि सुमारे १२,००० बसेसमध्ये जीपीएस बसवण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित सर्व बसमध्ये जीपीएस बसवण्याचे निर्देश दिले आहेत.

लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटी नेमकी कधी येणार याची माहिती मिळत नसल्याने ताटकळावे लागते. यापुढे अॅपवर बसचे थांबे आणि बस स्थानकात ती येण्याची अपेक्षित वेळ अगदी २४ तास अगोदर समजणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

असे कळणार लोकेशन 

एसटीच्या प्रवाशांनी काढलेल्या तिकिटावर असलेला ट्रिप कोड एसटीच्या अॅप्लिकेशनमध्ये ट्रॅक बसवर टाकल्यावर तिचे लोकेशन समजणार आहे. त्यामध्ये इतर मार्गावरील गाड्या, त्यांची वेळ, त्या सर्व गाड्यांचे थांबे हे देखील समजणार आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. याद्वारे राज्यभरातील एसटीवर नियंत्रण ठेवण्यात येणार होते.

एसटीच्या लाइव्ह ट्रॅकिंगसाठी अॅप (लाइव्ह ट्रॅकिंग) पुढील महिन्यात सुरू केला जाईल, तर पुढील दोन महिन्यांत सर्व बसेसमध्ये जीपीएस बसवण्यात येईल -प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

टॅग्स :मुंबईबसचालकप्रताप सरनाईक