Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी तापले, १० एसी लोकल रद्द; बदलापूर, कळव्यातील आंदोलनानंतर एसीचे नवे वेळापत्रक येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 06:20 IST

गर्दीच्या वेळेत साध्या गाड्यांचे वातानुकूलित (एसी) गाड्यांत रूपांतर केल्याने प्रवाशांच्या रोषाला, आंदोलनाला सामोरे जावे लागलेल्या मध्य रेल्वेने अखेर नमते घेतले

मुंबई/डोंबिवली :

गर्दीच्या वेळेत साध्या गाड्यांचे वातानुकूलित (एसी) गाड्यांत रूपांतर केल्याने प्रवाशांच्या रोषाला, आंदोलनाला सामोरे जावे लागलेल्या मध्य रेल्वेने अखेर नमते घेतले असून, नव्याने सुरू झालेल्या सर्वच्या सर्व १० लोकलच्या फेऱ्या गुरुवारपासून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

आ. जितेंद्र आव्हाड, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना प्रवाशांतील असंतोषाची कल्पना दिली. तत्पूर्वी आव्हाड यांनी कोणतेही नेतृत्व नसलेले प्रवाशांचे आंदोलन आणखी भडकू शकते, असा इशारा दिला होता. नंतर विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित झाला होता. मात्र त्यावर निर्णय न घेता वेगवेगळ्या स्थानकांत पोलीस बंदोबस्त वाढवून रेल्वेने ही वाहतूक सुरूच ठेवली होती. या लोकलविरोधात कळव्यात आंदोलन झाले होते.

बदलापूरच्या प्रवाशांनी आधी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात नंतर बदलापूरला आंदोलन केले होते. बुधवारी पुन्हा स्टेशन मास्तरांना घेराव घालण्यात आला. कल्याण, डोंबिवलीतही दुपारच्या वेळी प्रवाशांनी साध्या गाडीऐवजी एसी लोकल सुरू केल्याने नाराजी व्यक्त केली होती. 

हायब्रिड लोकलची सूचना  

  • साध्या लोकलला एसीचे काही डबे जोडून अशा हायब्रिड गाड्या गर्दीच्या वेळी चालवण्याची सूचना खा. श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांच्याकडे केली. 
  •  एसी लोकलचे भाडे कमी करून साध्या गाडीतील प्रवाशांना एसी गाडीत जाण्यासाठी प्रोत्साहन द्या, असे त्यांनी सुचवले. 
  •  कळवा कारशेडमधून निघणारी लोकल कळवा स्थानकात थांबवण्याची मागणी आ. आव्हाड यांच्याप्रमाणे खा. शिंदे यांनी केली. 
टॅग्स :एसी लोकलमध्य रेल्वे