मुंबई - मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर तसेच हार्बर मार्गावरही रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे. मुख्य मार्गावर विद्याविहार आणि ठाणे दरम्यान ५व्या, ६व्या मार्गावर सकाळी ८ वाजल्यापासून ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारचा प्रवास खडतर असणार आहे.
मेल-एक्स्प्रेसचे मार्ग बदलणारब्लॉक कालावधीत डाऊन मेल / एक्स्प्रेस विद्याविहार स्थानकात येथे डाऊन जलद मार्गावर वळविल्या जातील आणि ठाणे स्थानकात पाचव्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. अप मेल-एक्स्प्रेस ठाणेस्थानकात अप जलदमार्गावर वळविल्या जातील आणि विद्याविहारजवळ सहाव्या मार्गावर पुन्हा वळविल्या जातील. हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि चुनाभट्टी-वांद्रे स्थानकांदरम्यान अप मार्गावर ११ वाजल्यापासून ते ४.१० वाजेपर्यंत आणि डाऊन हार्बर मार्गावर ११.४० वाजल्यापासून ते ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी व वाशी-बेलापूर-पनवेल दरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तसेच गोरेगाव-वांद्रे येथून १०.४५ वाजल्यापासून ते ५.१३ वाजेपर्यंत सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत कुर्ला-पनवेल दरम्यान २० मिनिटांच्या वारंवारतेने विशेष सेवा चालविल्या जातील.