Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 12:36 IST

Western And Central Railway: मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला मिळणाऱ्या सोयी, सुविधांमध्ये दुजाभाव होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

Western And Central Railway: मुंबईतील पश्चिम, मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर या मार्गांवरून दररोज लाखो मुंबईकर अविरत प्रवास करत असतात. वाढत्या प्रवाशांमुळे रेल्वेवरील ताण वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यातच मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असले, तरी ते अपुरे पडताना पाहायला मिळत आहेत. यातच रेल्वे सोयी, सुविधा, लोकल ट्रेनच्या बाबतीत भारतीय रेल्वे ही मध्य आणि पश्चिम रेल्वेत दुजाभाव करत असल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. 

भारतातील पहिली १५ डब्यांच्या पूर्ण बनावटीची लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. ही लोकल चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून मुंबईत येत आहे. येत्या काळात अशा प्रकारचे आणखी १२ लोकल लवकरच पाठवण्यात येणार असल्याचे आयसीएफकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच स्वयंचलित दरवाजे बंद होणारी नॉन एसी लोकल दाखल होणार आहे. मुंबईतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन प्रवासी वापरात आणल्यावर या लोकलमध्ये सुरक्षितता आणि सुविधाजनक प्रवास अशा दृष्टीने विविध चाचण्या घेण्यात येणार आहेत. यातच रेल्वेचे मध्य आणि पश्चिम रेल्वेबाबत सावत्र प्रेम असल्याची कुजबुज प्रवाशांमध्ये सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.

सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!

नव्याने १५ डब्यांची पहिली लोकल पश्चिम रेल्वेत दाखल होणार आहे. मात्र, तुलनेत मध्य रेल्वेचा विस्तार मोठा असून, सर्वाधिक प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. या मार्गावर कायमच गर्दी असल्याने येथे सुविधा मिळणे अपेक्षित होते. मात्र, रेल्वे प्रशासन नेहमीच हात आखडता घेते. हे योग्य नसल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. केंद्रीय रेल्वे बोर्डाने ६० लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या, त्यापैकी मुंबई मार्गावर अवघ्या दोन गाड्यांचा समावेश आहे. मुंब्यात अपघात घडला, त्यावेळी सर्व लोकल १५ डबे आणि बंद दरवाजा करणे रेल्वेला सुचले आणि सुविधा देताना पश्चिम रेल्वेला, हा दुजाभाव नाही का? असा सवाल प्रवाशांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना केला.

दरम्यान, १५ डब्यांची लोकल फेऱ्या वाढवण्यासाठी आणखी पंधरा डब्याच्या ट्रेनची मागणी पश्चिम रेल्वे कडून करण्यात आली होती. त्याची पूर्तता म्हणून नवीन  लोकल पश्चिम रेल्वेच्या ताब्यात दाखल होणार आहेत. यापूर्वी १२ डब्यांच्या लोकल मिळत असून त्यामध्ये तीन डबे वाढवून ती पंधरा डब्यांची करण्यात येत होती. परंतु आता आयसीएफ थेट पंधरा डब्यांची लोकल पुरवत असल्याने याचा फायदा विभागीय रेल्वेला होणार आहे. दुसरीकडे, मध्य रेल्वेवरील नॉन एसी स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकलने मुंबईकर प्रत्यक्ष प्रवास करतील आणि त्या प्रवासयोग्य आहेत की नाही, हे सांगतील, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Railways' 'Step-Motherly' Treatment: Allegations of Bias Towards Western Railway!

Web Summary : Passengers allege bias as Western Railway receives new 15-car locals while Central Railway gets non-AC ones. Commuters question unequal facility distribution despite Central Railway's larger network and overcrowding, accusing Railway of favoritism.
टॅग्स :मुंबई लोकलभारतीय रेल्वेपश्चिम रेल्वेमध्य रेल्वेहार्बर रेल्वेलोकलरेल्वे प्रवासी