Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Airport Chaos: प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट! सलग तिसऱ्या दिवशी मुंबई विमानतळावरचे प्रचंड गदारोळ, चित्र कायम

By मनोज गडनीस | Updated: December 6, 2025 12:17 IST

Indigo Crisis: विमानांची नेमकी स्थिती काय आहे, विमान रद्द झाले आहे का किंवा ते कधी उड्डाण घेणार आहे, याची कोणतीही नीट माहिती प्रवाशांना मिळत नव्हती.

- मनोज गडनीस, मुंबईसलग तिसऱ्या दिवशी इंडिगो कंपनीच्या विमानांचा गोंधळ कायम असल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मुंबई विमानतळावर संपात, मनस्ताप आणि वादावादीचे चित्र कायम दिसले. विशेषतः शुक्रवारी इंडिगो कंपनीने अधिकच घोळ घातल्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला. 

शुक्रवारी कंपनीची एक हजारांहून अधिक विमाने देशभरात रद्द झाली. मात्र, विमानांची नेमकी स्थिती काय आहे, विमान रद्द झाले आहे का किंवा ते कधी उड्डाण घेणार आहे, याची कोणतीही नीट माहिती प्रवाशांना मिळत नव्हती. त्यामुळे मुंबई विमानतळावरील इंडिगोच्या काउंटरवर प्रवासी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संतप्त होऊन प्रश्न विचारत होते. 

धक्कादायक गोष्ट म्हणजे, प्रवाशांना उत्तरे देण्यासाठी कंपनीने अत्यंत कनिष्ठ पातळीवरचे कर्मचारी तैनात ठेवले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना नीट माहिती न दिल्यामुळे ही माहिती प्रवाशांपर्यंत नीट पोहोचत नव्हती. अलीकडच्या काळात मुंबई विमानतळावरून विक्रमी 

संख्येने प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे देशांतर्गत प्रवासासाठीही प्रवाशांना किमान दोन तास आधी येण्यास सांगितले जाते. मात्र, विमानेच रद्द झाल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

महिला, वृद्ध आणि लहान मुलांचे हाल

मुंबई विमानतळावर शुक्रवारी काही प्रवाशांनी कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. महिला, वृद्ध आणि लहान मुलांचे प्रामुख्याने हाल पाहायला मिळाले. 

इंडिगो कंपनीच्या विमानाने प्रवास करणारे शेकडो प्रवासी आणि अन्य विमानांनी जाणारे शेकडो प्रवासी यामुळे विमानतळावर प्रचंड गर्दी झाली होती. 

सामानाच्या बॅगाही मोठ्या प्रमाणावर विखुरलेल्या होत्या. विमानतळावरील खुर्च्याच नाही, तर जमिनीवरही बसायला लोकांना जागा मिळत नव्हती. त्यातच स्वच्छतागृहांबाहेरही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. 

जेवणात मिळाले केवळ सँडविच, पाण्याची छोटी बाटली

स्वच्छतागृहाची सफाई करणे हे देखील आव्हानात्मक झाले होते. त्रास होणाऱ्या प्रवाशांना कंपनीतर्फे नाश्ता, पाणी दिले जात होते. मात्र, जेवणाच्या वेळी केवळ सँडविच आणि छोटी पाण्याची बाटली दिल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. 

एका विमानाने दुसरीकडे जाऊन ज्यांना पुढची विमाने पकडायची होती, त्यांनाही पुढील विमानाने जाणे शक्य न झाल्यामुळे त्याचाही आर्थिक भार प्रवाशांना सोसावा लागला. 

शनिवारीही कंपनीची देशभरातील किमान एक हजार विमाने रद्द होण्याची शक्यता आहे. कंपनी नीट माहिती देत नसल्यामुळे विमानतळावर तरी जायचे की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indigo Flight Cancellations Cause Chaos at Mumbai Airport for Third Day

Web Summary : Indigo flight cancellations caused chaos at Mumbai Airport for three days. Passengers faced delays, lack of information, and inadequate facilities, especially women, the elderly, and children. Many flights were canceled without prior notice, leaving passengers stranded and frustrated.
टॅग्स :इंडिगोविमानतळविमानमुंबई विमानतळ