प्रवासी करातून एसटीची सुटका नाही
By Admin | Updated: July 7, 2015 02:59 IST2015-07-07T02:59:22+5:302015-07-07T02:59:22+5:30
तिकिटांवर प्रवासी कर लादण्यात येत असल्यामुळे महामंडळाला सरकारकडे कोट्यवधी रुपये भरावे लागत आहेत.

प्रवासी करातून एसटीची सुटका नाही
मुंबई : तिकिटांवर प्रवासी कर लादण्यात येत असल्यामुळे महामंडळाला सरकारकडे कोट्यवधी रुपये भरावे लागत आहेत. त्यामुळे सध्या साडे बारा टक्के असलेल्या प्रवासी करात पाच टक्के भांडवली अंशदान (सूट) देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. मात्र दोन महिने उलटूनही त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे एसटी महामंडळ अजूनही सरकारकडे कोट्यवधी रुपये भरत आहे. त्यामुळे महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसत आहे.
एसटी महामंडळाकडे जवळपास १८ हजार बसेस असून त्यामधून दिवसाला ६५ ते ७0 लाखांच्या दरम्यान प्रवासी प्रवास करतात. यात प्रवाशांच्या तिकिटांवर सध्या १२.५0 प्रवासी कर आकारला जात आहे. याआधी साडेसतरा टक्के प्रवासी कर आकारला जात होता. मात्र सरकारकडून काही महिन्यांपूर्वी पाच टक्के भांडवली अंशदान देण्यात आल्यामुळे हा कर साडे बारा टक्के एवढा आकारला जाऊ लागला. यामध्ये साडे बारा टक्क्यानुसार एसटी महामंडळ वर्षाला कोट्यवधी रुपये सरकारकडे जमा करत आहे. मात्र साडे बारा टक्के असलेल्या करातही आणखी पाच टक्के भांडवली अंशदान मिळावे, अशी मागणी एसटी महामंडळाकडून सरकारकडे वारंवार करण्यात आली. ही मागणी एप्रिल महिन्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरही करण्यात आली. या निर्णयामुळे एसटीचे जवळपास ४00 कोटी रुपये वाचणार होते. परंतु मंत्रिमंडळातील बैठकीत झालेल्या निर्णयाची अद्यापही सरकारकडून अंमलबजावणी न झाल्याने एसटी महामंडळ सरकारकडे साडे बारा टक्के एवढाच कर भरत असल्याचे एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. ही सूट मिळाल्यास महामंडळाची आर्थिक चणचण आणखी कमी होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
हा कर लादण्यात येत असल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. कर १० टक्के कमी झाल्यास तेवढाच फायदा एसटी महामंडळाबरोबरच प्रवाशांनाही होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे यापुढे भाडेवाढ झाल्यास ती फारच कमी होऊ शकते, असा अंदाज एसटी अधिकाऱ्यांकडूनच वर्तविण्यात येत आहे.