Join us  

विमानात तल्लफ लागली, आणि थेट सिगारेटच फुंकली, प्रवाशाला अटक : माचिसही केली हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 9:51 AM

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मस्कतवरून (ओमान) मुंबईला येणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात धूम्रपान करणाऱ्या प्रवाशाला पोलिसांनी अटक केली. बालाकृष्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मस्कतवरून (ओमान) मुंबईला येणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात धूम्रपान करणाऱ्या प्रवाशाला पोलिसांनी अटक केली. बालाकृष्ण राजायन (५१) असे त्याचे नाव असून तो तमिळनाडूचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

एअरलाइन्सचे सुरक्षा पर्यवेक्षक विन्सली लोपीस (३४) यांनी सहार पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना ७ मे रोजी त्यांचे वरिष्ठ अक्षय कारंडे यांनी फोन करत फ्लाईट क्रमांक युके २३४ मध्ये एक प्रवासी विमानात गैरप्रकार करत असल्याचे सांगितले. त्यानुसार लोपीस यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी क्रू मेंबरकडे केलेल्या चौकशीत विमानाच्या मागच्या बाजूला असलेल्या स्वच्छतागृहात विमान प्रवासादरम्यान रात्री ११.५६ वाजताच्या सुमारास धूम्रपान करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जी बाब विमानात असणाऱ्या स्मोक डिटेक्टरद्वारे विमानाच्या पायलटना समजल्याचेही कर्मचाऱ्यांनी नमूद केले.  

पोलिसांच्या ताब्यात त्यांनी राजायनकडे चौकशी केली.  तेव्हा त्याने धूम्रपान केल्याची कबुली दिली.  त्याच्याकडे असलेली माचिसची एक डबी देखील त्याने तपास अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केली. विमानामध्ये नो स्मोकिंगचे फलक लावलेले असून प्रत्येक उड्डाणापूर्वी हिंदी आणि इंग्रजी भाषेत धूम्रपान न करण्याच्या सूचनांसह त्याचे धोके प्रवाशांना सांगितले जातात. मात्र, तरीही या प्रवाशाने धूम्रपान करत स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात टाकल्या प्रकरणी त्याला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी राजायन विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३३६ आणि विमान अधिनियम कलम २५ अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

टॅग्स :विमान