Join us  

पक्षानं सांगितलं तिकीट देणार नाही; पण मी म्हटलं का ? - खडसे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 3:50 PM

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपामध्ये नाराज असल्याची चर्चा आहे.

मुंबईः  गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपामध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे यांना भाजपाकडून तिकीट मिळणार नसल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. तर दुसरीकडे खडसे म्हणाले, आपण भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत, आपण नेहमी पक्षाच्या आदेशाचं पालन करणारे कार्यकर्ते राहिलो आहोत. पक्षाच्या आदेशानं मंत्रिपदाचा राजीनामा दिला. गेले 30 वर्षे तुम्ही मला निवडून देताय. एखादा विषय आकलनाच्या पलिकडचा असतो. पक्षानं सांगितलं तुम्हाला तिकीट देणार नाही. तुम्ही सांगाल त्याला तिकीट देऊ. तेव्हा मी विचारलं, मी का नको याचं उत्तर दिल्यास माझं समाधान होईल. माझे सर्वच कार्यकर्ते खडसे आहेत, असंही पक्षाला कळवलं आहे.पक्ष जो काही निर्णय घेईल तो मान्य करून आपल्याला चालावं लागेल. मला त्रास होईल, असा कोणताही निर्णय घेऊ नका. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.  त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी खडसेंच्या प्रवेशावर मोठं विधान केलं आहे. शरद पवार म्हणाले, सत्ताधारी पक्षाचे तीन ते चार लोक आमच्या संपर्कात आहेत. ज्या पक्षासाठी काम केलेलं आहे, तिथे त्यांना भवितव्य नाही. भवितव्य नाही, संधी नाही, ते लोक पर्याय शोधत असतात. तुम्ही नावं घेतली ते लोक काही महिन्यांपासून संपर्कात आहेत.नाहटा जन्म बारामतीला झाला आहे, असं म्हणत पवारांनी विजय नाहटा आणि खडसेंच्या पक्ष प्रवेशासंदर्भातही सूचक विधान केलं आहे. तर पवारांच्या विधानावर खडसेंना छेडलं असता ते म्हणाले, मी तीन महिने काय तीन वर्ष त्यांच्या संपर्कात नाही, असाही खुलासा केला आहे. तसेच एकनाथ खडसे यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, अशी मागणीही खडसेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे लावून धरली आहे. 

टॅग्स :एकनाथ खडसेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019