Join us  

पक्षांतरावर बोलणे लोकांनी टाळले पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 5:21 AM

संजय राऊत यांचे मत । आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत, ही शिवसेनेची इच्छा

ठाणे : पुढील आठ दिवस उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कोणीही पक्षांतरावर मत व्यक्त करू नये. कोण कोठे जाईल, कोण कोठे येईल आणि कोण मधल्यामध्ये लटकेल, हे मी आता सांगू शकत नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत लोकांनी पक्षांतरावर बोलणे टाळले पाहिजे, असे मत खा. संजय राऊत यांनी ठाण्यात व्यक्त केले.

गडकरी रंगायतन येथे शनिवारी सकाळी ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे यांच्या ‘स्वप्नांचे आकाश’ या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर पत्रकारांशी बोलताना पक्षांतरावर पुढील आठ दिवस कोणीही काही बोलू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. शिवसेनेनेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे. आदित्य यांनी विधानसभा लढवावी, अशी पक्षाबरोबर संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे त्यांच्यावर प्रेम आहे. राज्यात त्यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. मराठवाड्यापासून विदर्भापर्यंत, उत्तर महाराष्ट्रातही लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या यात्रेत सहभागी होत आहेत.

बाळासाहेब ठाकरे तरुण असताना त्यांच्यावेळी लोकांचा असाच उत्साह होता. आदित्य यांनी पक्षाचे, राज्याचे नेतृत्व करावे, अशी सर्वांची भावना असेल, तर कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. कारण, नवीन पिढी ही राजकारणात आली पाहिजे, असेही राऊत म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनामुंबई