Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 12:22 IST

आचार्च अत्रे चौक स्थानकाचं काम मेट्रो सुरू होऊनही पूर्ण झालेलं नाही. या अर्धवट कामाचा फटका रस्ते वाहतुकीला होत आहे.

मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या भुयारी मेट्रो अर्थात मुंबई मेट्रो-३ चा संपूर्ण टप्पा आता दोन दिवसात सुरू होणार आहे. यात आरे ते कफ परेड असा प्रवास करणं मुंबईकरांना सहजशक्य होणार आहे. पण या मार्गिकेवरील आचार्य अत्रे चौक स्थानकाचं काम मेट्रो सुरू होऊनही पूर्ण झालेलं नाही. या अर्धवट कामाचा फटका रस्ते वाहतुकीला बसत आहे. आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) ते मुंबई महानगरपालिका यानगृह बस स्टॉपपर्यंत सध्या वाहतुकीसाठी एकच लेन सुरू आहे. त्यामुळे 'रस्त्याखाली काम, पण रस्त्यावर ट्रॅफिक जॅम' असं चित्र वरळी नाक्यावर रोज पाहायला मिळतं. 

मुंबई मेट्रो-३ चा बीकेसी ते आचार्य अत्रे चौक वरळी नाका हा दुसरा टप्पा ९ मे २०२५ रोजी सुरू झाला. यात आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) स्थानकाच्या ६ पैकी सध्या दोनच एन्ट्री आणि एग्झिट मार्ग सुरू आहेत. तर उर्वरित चार एन्ट्री आणि एग्झिटचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. या कामामुळे रस्त्याची एक बाजू खोदून ठेवली आहे. तर एका लेनवरुन दुहेरी वाहतूक सुरू आहे. यामुळे रहदारीच्या वेळी या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यात रस्त्याच्या कामामुळे या ठिकाणी सखल भाग झाल्यामुळे पावसाळ्यात पाणीही साचले होते.

डिसेंबरशिवाय सुटका नाही! 

वरळी नाक्यावर मेट्रोच्या कामासाठी रस्ता बंद केला आहे, पण तिथे काम करताना कुणीच कामगार दिसत नाहीत, असं 'लोकमत मुंबई'च्या निदर्शनास आलं. वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या वेळी आम्ही या ठिकाणी पाहणी केली. तेव्हा, रस्त्याखाली काही काम सुरू असल्याचं दिसलं. DOGUS-SOMA JV कंपनी हे काम करत आहे. जोपर्यंत रस्त्याखालील काम पूर्ण होत नाही, तोवर रस्त्यावरचं काम करता येणार नसल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर आम्ही  मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनशी (MMRC) संपर्क साधला. त्यांचं उत्तर पाहता, डिसेंबरपूर्वी हे रस्त्याचं काम मार्गी लागणं कठीणच आहे.  

"मुंबई मेट्रो मार्ग- ३ चे आचार्च अत्रे चौक स्थानकाचे स्थापत्य काम पूर्ण झाले आहे. सध्या ६ पैकी २ प्रवेश-निर्गमन (A4 व B5) नागरिकांच्या वापरासाठी खुले आहेत. तर उर्वरित प्रवेश-निर्गमनांवरील स्थापत्य काम पूर्ण झाले असून लिफ्ट व एस्कलेटरसारख्या प्रणालींचे काम प्रगतिपथावर आहे. A1 व A2 समोरील रस्त्याचे भराव काम पावसाळ्यामुळे काही काळ बाधित झाले होते. हे काम आता पुन्हा सुरू करण्यात आले असून डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होऊन नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करुन दिले जाईल.", असं एमएमआरसीने स्पष्ट केलं आहे. 

अर्धवट कामामुळे मुंबईकरांना कसा त्रास होतोय पाहा व्हिडिओ रिपोर्ट...

संथगतीने काम'एमएमआरसी'च्या दाव्यानुसार आचार्य अत्रे चौक स्थानकाचे स्थापत्य काम पूर्ण झाले आहे. लिफ्ट व एस्कलेटरसारख्या प्रणालींचे काम प्रगतिपथावर आहे. A1 व A2 समोरील रस्त्याचे भराव काम पावसाळ्यामुळे काही काळ बाधित झाले होते. हे काम आता पुन्हा सुरू करण्यात आले असून डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होऊन नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करुन दिले जाईल. परंतु, याठिकाणी खोदून ठेवलेल्या रस्त्यावर अतिशय संथगतीने काम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिकांनीही कामाच्या गतीबाबत साशंकता व्यक्त केली आहे आणि सध्याच्या कामाची गती पाहता डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणं अशक्य असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.   

English
हिंदी सारांश
Web Title : Worli Naka Metro work delays cause traffic woes for commuters.

Web Summary : Incomplete Worli Naka metro work causes traffic jams. Only one lane is open, inconveniencing commuters. Completion is expected by December 2025, prolonging the issue.