शहरातील अर्धवेळ ग्रंथपाल पगाराविना
By Admin | Updated: November 30, 2015 02:47 IST2015-11-30T02:47:46+5:302015-11-30T02:47:46+5:30
शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी असल्याचे दाखवत, मुंबईतील अनेक शाळांमधील अर्धवेळ ग्रंथपालांचे वेतन थांबविण्याचे आदेश शिक्षण निरीक्षक कार्यालयांनी दिले आहेत.

शहरातील अर्धवेळ ग्रंथपाल पगाराविना
मुंबई : शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी असल्याचे दाखवत, मुंबईतील अनेक शाळांमधील अर्धवेळ ग्रंथपालांचे वेतन थांबविण्याचे आदेश शिक्षण निरीक्षक कार्यालयांनी दिले आहेत. परिणामी, अनेक ग्रंथपाल बेरोजगार होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे वेतन तातडीने देण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.
नियमित सेवेत असलेल्या अर्धवेळ ग्रंथपालांच्या समस्येबाबत लवकर तोडगा काढला नाही, तर शिक्षक परिषद सोमवारी राज्याचे शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांना पुढील आंदोलनाचे निवेदन देणार आहे. याबाबत शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले की, ‘विद्यार्थी संख्या कमी झाल्याचे कारण देत अर्धवेळ ग्रंथपालांना वेतन देता येत नाही, असे आदेश मुंबई विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शिक्षण निरीक्षक कार्यालयांना दिले आहेत. त्यामुळे ग्रंथपालांचे वेतन थांबविण्यात आले आहे. कोणत्याही अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याला कमी करणार नाही, असे आश्वासन शालेय शिक्षण विभागाने दिले आहे. मात्र, तरीही अर्धवेळ ग्रंथपालांचे वेतन तातडीने सुरू करावे,’ अशी मागणी बोरनारे यांनी केली
आहे.
एकीकडे वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत ग्रंथमहोत्सवाचे आयोजनही केले जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शाळेच्या शिक्षकांसोबतच ग्रंथपालांचे मोठे योगदान असते. परिणामी, शाळेत ग्रंथपाल नसतील, तर ग्रंथालयांकडे विद्यार्थ्यांची पावले वळतील तरी कशी, असा उलट प्रश्न शिक्षक परिषदेने केला आहे. शिवाय अर्धवेळ ग्रंथपालांचे पद शाळांमध्ये कायम ठेऊन, त्यांची वेतनदेयके
स्वीकारावीत, अशी मागणीही परिषदेने केली आहे.