Join us  

पार्ले टिळकचा सुवर्णमहोत्सवी सन्मान, टपाल विभागाकडून विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 7:40 AM

९ जून १९२१ साली केवळ चार विद्यार्थ्यांसह सुरू झालेली आणि आज २६ हजार विद्यार्थ्यांहून अधिक विद्यार्थ्यांसह पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन संस्थेअंतर्गत ५ शाळा, ३ महाविद्यालये, एक व्यवस्थापकीय शैक्षणिक संस्था असा एका शिक्षण संस्थेचा प्रवास निश्चितच थक्क करणारा आहे.

मुंबई :  पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनने लावलेल्या ज्ञानदानाच्या एका छोट्या रोपट्याचे  रुपांतर वटवृक्षामध्ये झाले आहे. या संस्थेच्या मागील १०० वर्षांत शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत टपाल विभागामार्फत एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले, अशी माहिती मुंबई टपाल विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांड्ये यांनी दिली.

बुधवारी पार्ले टिळक असोसिएशनच्या यूट्यूब वाहिनीवरून आणि फेसबुक पेजवर संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित आभासी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ९ जून १९२१ साली केवळ चार विद्यार्थ्यांसह सुरू झालेली आणि आज २६ हजार विद्यार्थ्यांहून अधिक विद्यार्थ्यांसह पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन संस्थेअंतर्गत ५ शाळा, ३ महाविद्यालये, एक व्यवस्थापकीय शैक्षणिक संस्था असा एका शिक्षण संस्थेचा प्रवास निश्चितच थक्क करणारा आहे.

सुप्रसिद्ध साहित्यिक कै. पु. ल. देशपांडे,अभिनेते सचिन खेडेकर, शेतकरी आंदोलनाचे नेते कै. शरद जोशी, क्रिकेटपटू अजित पै, अभिनेत्री मधुरा वेलणकर, बुद्धिपळपटू प्रवीण ठिपसे यांच्यापासून ते डॉ. अविनाश सुपे यांच्यासारखे माजी विद्यार्थी म्हणजे संस्थेचे या विद्यालयाची यशोपताका फडकावणारे भूषण असल्याची प्रतिक्रिया संस्थेच्या संचालक मंडळातील सदस्य, माजी शिक्षक, मुख्याध्यापक यांनी दिली. संचालक मंडळातील अध्यक्ष अनिल गानू, कार्यवाह दिलीप पेठे हेमंत भाटवडेकर यांचा सक्रिय सहभाग शिवाय उत्तमोत्तम मुख्याध्यापकांची परंपरा सतत संस्थेला लाभत आहे.

संस्थेच्याच संचालक मंडळातील सदस्य म्हणून माजी मुंबई विद्यापीठ कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांनी कोविड काळात कार्यरत संस्थेच्या माजी-आजी विद्यार्थ्यांचा सन्मान केला. यात केईमचे माजी अधिष्ठाता आणि प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. अविनाश सुपे यांचाही समावेश होता. आपल्या शाळेने आपला सन्मान केला, याबद्दल मी कृतज्ञ असून हा माझ्या आयुष्याचा अनमोल ठेवा असल्याची भावनिक प्रतिक्रिया सुपे यांनी व्यक्त केली. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या साहाय्याने ‘शतकपूर्ती’ ही स्मरणिका तयार करण्यात आली आहे. या स्मरणिकेचे प्रकाशन माजी ज्येष्ठ शिक्षक नीळकंठ हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :पोस्ट ऑफिस