मुंबईतील उड्डाणपुलाखाली पार्किंगमाफिया

By Admin | Updated: April 20, 2015 01:18 IST2015-04-20T01:18:47+5:302015-04-20T01:18:47+5:30

उड्डाणपुलांखाली होणारे अनधिकृत पार्किंग बंद करावे, असे आदेश न्यायालयाने दिले असताना शहरातील अनेक उड्डाणपुलांखाली आजही मोठ्या प्रमाणात अनधिकृत

ParkingMafia under flyover in Mumbai | मुंबईतील उड्डाणपुलाखाली पार्किंगमाफिया

मुंबईतील उड्डाणपुलाखाली पार्किंगमाफिया

मुंबई : उड्डाणपुलांखाली होणारे अनधिकृत पार्किंग बंद करावे, असे आदेश न्यायालयाने दिले असताना शहरातील अनेक उड्डाणपुलांखाली आजही मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग सुरू आहे. त्यातच काही गर्दुल्ल्यांनी उड्डाणपुलाखाली अड्डे तयार केल्याने या ठिकाणी काही घातपाताची देखील शक्यता आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ अशा लोकांवर कारवाई करून या उड्डाणपुलाखाली बगिचे तयार करावेत, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांत शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्यात आले. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमीदेखील झाली. मात्र उड्डाणपूल तयार झाल्यानंतर त्याखाली मोठ्या प्रमाणात रिकामी जागा शिल्लक राहत होती. याच जागेवर काही माफियांनी कब्जा करून या ठिकाणी अनधिकृत पार्किंग स्लॉट तयार केले आहेत. याबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केल्यानंतर न्यायालयाने उड्डाणपुलाखांलील हे अनधिकृत पार्किंग हटवण्याचे आदेश शासनाला दिले. त्यानुसार अनेक उड्डाणपुलांखालील पार्किंग हटवण्यात आली. मात्र आजही अनेक ठिकाणी माफियांकडून पार्किंग बिनधास्त सुरूच आहे. तसेच शहरातील काही उड्डाणपुलांखालील जागेवर गर्दुल्ले आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी कब्जा केला आहे. या ठिकाणी दिवसभर जुगार आणि अमली पदार्थांचे सेवन केले जाते. त्याशिवाय काही ठिकाणी तर रात्रीच्या वेळेस वेश्याव्यवसाय देखील केला जात आहे. त्यामुळे या परिसरातून जाताना महिला अथवा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो. काही उड्डाणपुलांखाली तर अनेकांनी संसार थाटले आहेत. याच ठिकाणी झोपड्या तयार करून चुली पेटवल्या जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते. याच लोकांच्या माध्यमातून सिग्नलवर मोबाइल चोरी आणि लुटीच्या घटनाही घडत आहेत. पोलीस यंत्रणादेखील या सर्वांकडे दुर्लक्ष करीत असल्याने घातपाताची शक्यता देखील नाकारता येत नाही.
मुंबई शहरात महानगरपालिका, एमएआरडीए आणि पीडब्लूडी यांचे ४० ते ५० उड्डाणपूल आहे. मात्र यातील ४ ते ५ उड्डाणपुलांचीच योग्य देखरेख ठेवली जाते. या उड्डाणपुलांखाली बगिचे तयार केले आहेत.
अशाच प्रकारे इतर उड्डाणपुलांखाली देखील बगिचे तयार केल्यास मुंबई शहर हे खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि सुंदर होईल. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष नितीन नांदगांवकर यांनी पालिका आयुक्त, एमएमआरडीए मुख्य अभियंता, पोलीस आयुक्त, वाहतूक आयुक्त आणि पीडब्लूडी अभियंता यांना पत्रव्यवहार करून ही मागणी लावून धरली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: ParkingMafia under flyover in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.