पार्किंगच्या धोरणाची कोंडी

By Admin | Updated: March 30, 2015 22:30 IST2015-03-30T22:30:44+5:302015-03-30T22:30:44+5:30

दिवसेंदिवस वेगाने विकास पावत असलेल्या पनवेलचे रस्ते अरुंद असून जुन्या इमारतीत पार्किंगची सोय नसल्याने रस्त्यावरच पार्किंग केले जात आहे.

Parking policy stance | पार्किंगच्या धोरणाची कोंडी

पार्किंगच्या धोरणाची कोंडी

पनवेल : दिवसेंदिवस वेगाने विकास पावत असलेल्या पनवेलचे रस्ते अरुंद असून जुन्या इमारतीत पार्किंगची सोय नसल्याने रस्त्यावरच पार्किंग केले जात आहे. वाहतुकीचा सर्व्हे करून पार्किंगचे धोरण ठरविण्याकरिता वारंवार निविदा काढूनही एजन्सी मिळत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत चालली आहे.
पनवेलमध्ये मोठमोठी दुकाने, मॉल्स उभे राहिले. या ठिकाणी खरेदीसाठी ग्राहक येतात. कापड आणि झवेरी बाजारातही गर्दी उसळते. सिमेंटच्या जंगलाबरोबरच मोकळे भूखंड आणि जुन्या इमारतींच्या जागेवर नवीन घरगुती प्रकल्प उभारणीत बांधकाम व्यावसायिकांकडून इमारतीच्या तळमजल्यावर किंवा एकापेक्षा अधिक इमारती असल्यास पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते, मात्र शहरात सद्यस्थितीत बहुसंख्य सोसायट्या अशा आहेत की जेथे पार्किंगची सुविधाच नाही. त्यामुळे रहिवासी संरक्षक भिंतींच्या आतमधील एक ते दोन फूट उरलेल्या जागेत वाहने उभी करतात. काही इमारतींची अवस्था तर अत्यंत वाईट असून त्या ठिकाणी जिन्याखालच्या जागेत वाहने उभी करण्याची वेळ रहिवाशांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे रहिवाशांत वाहने उभी करण्यावरून खटकेही उडतात.
दीडशे वर्षे जुन्या असलेल्या नगरपालिकेने स्थानिक स्वराज्य संस्था या नात्याने नियोजन केले नाही, त्याचबरोबर बांधकाम परवाना आणि भोगवटा प्रमाणपत्र देताना बांधकाम व्यावसायिकांना पार्किंगसाठी जागा सोडण्याचा नियमही घातला नाही. नव्या इमारतींमध्ये पार्र्किंगसाठी जागा सोडली असली तरी बांधकाम व्यावसायिकांनी सदनिकाधारकांकडून त्या बदल्यात लाखो रुपये वसूल केले. त्यामुळे अनेकांनी पार्किंग स्पेस विकत घेतला नसल्याने त्यांना वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात.
काम घेता, कोणी काम?
शहरातील स्थानिक परिस्थितीचा अभ्यास, वाहतूक नियम व शासनाचे निकष यांचा विचार करून उपलब्ध जागांचा वापर कसा करता येईल याचा विचार करणे, त्याचबरोबर वाहतुकीचे नियमन ठरविण्याकरिता अहवाल तयार करण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्याचे ठरले आहे. मात्र तीनवेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळत नसल्याने काम घेता का कोणी, असे म्हणण्याची वेळ पालिकेवर आली आहे.

Web Title: Parking policy stance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.