महेश कोले, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महापालिकेच्या सशुल्क पार्किंग व्यवस्थेत गंभीर गैरप्रकार सुरू असून, कंत्राटदार वाहनचालकांकडून निश्चित दरापेक्षा जादा पैसे उकळत आहेत. वाहनचालकांना अनेकदा या रकमेची पावतीही दिली जात नसल्याच्या वाहनचालकांच्या तक्रारी आहेत.
या वाहनतळासाठी प्रतितास ७० रुपये पार्किंग शुल्क असताना वाहनधारकांकडून १०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम आकारली जात आहे. पुढील तासांसाठीही त्याच प्रमाणात वाढीव दर लावले जात असल्याने नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. काही ठिकाणी तर ‘पावती नको असल्यास ७० रुपये वैयक्तिक खात्यावर पाठवा, त्यामुळे ३० रुपये वाचतील,’ अशी बतावणी करून नागरिकांची फसवणूक केली जात आहे.
याबद्दल अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी ‘ए’ वॉर्डचे सहायक आयुक्त गजानन बेल्ले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. मरिन ड्राइव्ह परिसरातील दोराबजी टाटा मार्ग तसेच पालिका मुख्यालयाशेजारील फोर्ट बाय लाइन येथे पालिकेची २४ तास सशुल्क पार्किंग सुविधा उपलब्ध आहे. मंगळवारी एका वाहन चालकाने त्याची गाडी पार्क केल्यावर त्याला किती तास गाडी ठेवणार, असे कर्मचाऱ्याकडून विचारण्यात आले.
१०० मीटरवर रेट चार्ट
- कर्मचाऱ्याकडून वाहन मालकाला १०० रुपये प्रतितास असे सांगून पावती देण्यात आली. यावेळी रेट चार्ट कुठे आहे, असे विचारल्यावर कर्मचाऱ्याने सुमारे १०० मीटर दूर बोर्ड लावला असून तिथे जाऊन पाहा, असे उद्धटपणे सांगण्यात आले. चार्ट दिसत नसल्याने वाहनचालकाने नाईलाजाने त्याला पैसे दिले.
- रोहित उतेकर या वाहनधारकाने मरिन ड्राइव्हच्या ऑबेरॉय मॉल समोरच्या रस्त्यावर गाडी पार्किंग केल्यावर कर्मचारी निशांत कुमार याने १०० रुपये अधिकृत पैसे असून, ७० रुपये वैयक्तिक खात्यावर पाठवल्यास माझाही फायदा होईल आणि तुमचे पैसे वाचतील, असे सांगितले.
- रोहित यांनी ७० रुपये देत तेवढेच अधिकृत शुल्क असून पावती द्यावी, असे सांगितले. त्यास कर्मचाऱ्याकडून टाळाटाळ करण्यात आली. अनेक पार्किंगच्या ठिकाणी वाहनचालकांची लूट होत आहे आणि महापालिका कंत्राटदारांवर कारवाई करीत नसल्याची तक्रार आहे.
आम्ही नेहमी चौपाटीवर फिरायला येतो. पार्किंग कर्मचारी आमच्याकडून १०० रुपये घेतात. कधी पावती दिली जाते. पार्किंगचे दरपत्रक खूप बारीक अक्षरांमध्ये असून कोपऱ्यात लावल्याने ते नीट दिसतही नाही. -रोहित उतेकर, वाहनधारक
Web Summary : Mumbai's parking contractors are allegedly overcharging citizens, sometimes without receipts. Motorists report being asked to pay ₹100 instead of ₹70 per hour. The municipality has not addressed complaints of exploitation.
Web Summary : मुंबई के पार्किंग ठेकेदार कथित तौर पर नागरिकों से अधिक शुल्क वसूल रहे हैं, कभी-कभी बिना रसीद के। वाहन चालकों ने ₹70 प्रति घंटे की जगह ₹100 देने की शिकायत की है। नगरपालिका ने शोषण की शिकायतों का समाधान नहीं किया है।