भावंडांच्या मृत्यूप्रकरणी उद्यान सुपरवायझरला अटक, माटुंगा पोलीस तपास करणार
By मनीषा म्हात्रे | Updated: March 21, 2024 16:05 IST2024-03-21T16:05:04+5:302024-03-21T16:05:20+5:30
वडाळा रोड परिसरात राहणाऱ्या चार ते पाच वर्षाच्या अंकुश आणि अर्जुन वाघरी या दोन भावंडांचा यामध्ये मृत्यू झाला. खेळताना पाण्याच्या टाकीत बाटलीने पाणी भरण्याचा प्रयत्न करत असताना टाकीत पडल्याचे सीसीटिव्हीतून दिसून आले.

भावंडांच्या मृत्यूप्रकरणी उद्यान सुपरवायझरला अटक, माटुंगा पोलीस तपास करणार
मुंबई : माटुंगा महर्षी कर्वे रोड येथील पालिकेच्या वन गार्डनमधील पाण्याच्या टाकीत पडून दोन भावंडांच्या मृत्यूप्रकरणी माटुंगा पोलिसांनी कंत्राटदार कंपनीच्या सुपरवायझरला अटक केली आहे. चौकशीत पालिकेने गार्डनच्या मेटेन्सच्या कामाची जबाबदारी हिरावती एंटरप्रायझेसला दिलयाचे समोर आले. हिरावतीने गार्डनच्या देखभालीसाठी सुपरवायझर म्हणून पतीराम विक्रम यादवची नेमणुक केल्याचे समोर येताच त्याला अटक करण्यात आली आहे.
वडाळा रोड परिसरात राहणाऱ्या चार ते पाच वर्षाच्या अंकुश आणि अर्जुन वाघरी या दोन भावंडांचा यामध्ये मृत्यू झाला. खेळताना पाण्याच्या टाकीत बाटलीने पाणी भरण्याचा प्रयत्न करत असताना टाकीत पडल्याचे सीसीटिव्हीतून दिसून आले. आरएके मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू करण्यात आला. मंगळवारी हा गुन्हा पुढील तपासासाठी माटुंगा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. वन गार्डनमध्ये खूप जुनी जमिनीत पाण्याची मोठी टाकी असून त्या टाकीचा झाकणे उघडी होती, त्याच्यावर काळ्या रंगाचे प्लास्टिक टाकण्यात आले होते. पाण्याच्या टाकीवर झाकणे नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आला.त्यानुसार, अपहरणाच्या दाखल गुन्ह्यात पालिकेच्या उद्यान विभागातील संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी कलमात वाढ करण्यात आली आहे.
पालिकेने माटुंगा पोलिसांना दिलेल्या माहितीत कंत्राटदारावर कंपनीवर खापर फोडले. त्यानुसार, पोलिसांनी कंत्राटदारविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. चौकशीत पालिकेने हिरावती एंटरप्रायझेसला काम दिले होते. हिरावतीकडून पतीराम विक्रम यादवची सुपरवायझर म्हणून नियुक्ती केल्याचे समोर आले. त्यानुसार यादवला अटक करण्यात आली आहे. यामध्ये आणखीन कुणाचा सहभाग आहे का? या दृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहे.