उपचारासाठी बाळंतिणीची फरफट
By Admin | Updated: June 16, 2015 04:21 IST2015-06-16T04:21:06+5:302015-06-16T04:21:06+5:30
कोसळणारा पाऊस आणि दुसरीकडे काळाकभिन्न अंधार... या अवस्थेत एका महिलेला प्रसूतीनंतर उपचारासाठी प्रचंड फरफट करावी लागली... नवजात बालकाची नाळ तुटलेली नाही...

उपचारासाठी बाळंतिणीची फरफट
मनीषा म्हात्रे, मुंबई
कोसळणारा पाऊस आणि दुसरीकडे काळाकभिन्न अंधार... या अवस्थेत एका महिलेला प्रसूतीनंतर उपचारासाठी प्रचंड फरफट करावी लागली... नवजात बालकाची नाळ तुटलेली नाही... प्रसूतीच्या वेदना शमलेल्या नव्हत्या... त्यात होणारा अतिरक्तस्राव... त्यामुळे ती उपचाराविना तब्बल चार तास विव्हळत होती... वेदना आणि भीतीने ‘ती’ बेशुद्ध अवस्थेत जाते की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. एखाद्या खेडेगावात घडलेली ही कहाणी वाटेल... पण, मुंबईसारख्या शहरात आणि मुलुंडसारख्या प्रगत उपनगरात ही लाजिरवाणी घटना घडली.
लोकलमध्ये जन्माला आलेल्या बाळ आणि बाळंतिणीला उपचारासाठी पालिकेनेही कमालीची उदासीनता दाखवली. रविवारी रात्री १०च्या सुमारास प्रियांका सुनील मिरपगारे (२४) या नऊ महिन्यांच्या गर्भवतीची लोकलमध्येच प्रसूती झाली. त्यानंतर मुलुंडच्या महापालिका रुग्णालयांनी तिला दाखल करून घेण्यास चक्क नकार दिला. अखेर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात रात्री अडीचच्या सुमारास तिला दाखल करून घेण्यात आले.
मूळची आंबिवली येथील प्रियांकाची मुलुंड पूर्वेकडील सावरकर रुग्णालयात प्रसूतीसाठी नोंदणी झाली होती. रविवारी रात्री ९.२०च्या सुमारास तिला प्रचंड प्रसूती वेदना सुरू झाल्या. मुलुंडच्या रुग्णालयात दाखल होण्यासाठी तिने सीएसटीकडे जाणारी लोकल पकडली. लोकल ठाणे स्थानकापर्यंत आल्यावर प्रियांकाच्या प्रसूती वेदना अनावर झाल्या. मुलुंड स्थानक काही अंतरावर असतानाच तिने मुलाला जन्म दिला. तथापि,
या नवजात मुलाने जगही
पाहिलेले नसतानाही त्याला या निष्ठूर समाजाचा चेहरा अनुभवायला मिळाला.
ही माहिती मिळताच मुलुंड रेल्वे पोलिसांनी तिला तत्काळ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयाच्या दिशेने नेले. सुरुवातीला मुलुंड पश्चिमेकडील पालिकेच्या मॅटर्निटी होममध्ये नेले. मात्र संबंधित डॉक्टरांनी महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे सांगून रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला. वेदनेने ती विव्हळत होती, मदतीसाठी याचना करत होती. पण केवळ बाळाची नाळ कापून तिला सावरकर रुग्णालयाकडे पाठवण्यात आले.
मात्र सावरकर रुग्णालयात तिला आधीपेक्षाही वाईट अनुभव आला. अनेक विनवण्या करूनही रुग्णालय प्रशासनाने तिची कोणतीही दखल घेतली नाही. उलट तिच्यासह आईला उर्मटपणे उत्तरे दिली. अखेर तब्बल चार तासांची फरफट झाल्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास प्रियंका आणि तिच्या बाळाला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्याच्या घडीला माता आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.
प्रशासनाच्या उदासीनतेची खंत...
एकीकडे डॉक्टर रुग्णांचे जीव वाचवतात, म्हणून त्यांना देवाची उपमा दिली जाते. मात्र पालिका डॉक्टरांच्या हैवान वृत्तीचा अनुभव आला. पालिका रुग्णालयाने दाखवलेल्या उदासीनतेबाबत खंत वाटते, असे प्रियांकाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
रुग्णालय प्रशासनाच्या पळवाटा...
प्रियांकाला उच्च रक्तदाबाचा त्रास असताना आणि प्रशासनाने तिला दाखल करून घेणे बंधनकारक असतानाही हे कारण पुढे करत रुग्णालयाने हात वर केले. सावरकर रुग्णालयात सुरुवातीपासून तिच्यावर उपचार सुरू होते. पुढील धोका टाळण्यासाठी आम्ही तिच्यावर प्राथमिक उपचार करून सावरकर रुग्णालयात जाण्याचे सांगितल्याचे मॅटर्निटी होमच्या वैद्यकीय अधीक्षिका दीपाली पळशीकर यांनी सांगितले. तर दुसरीकडे संबंधित प्रकरणाची काहीही माहिती नसून याची
माहिती घेऊन यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सावरकर रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सुजाता जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पालिकेकडे तक्रार - रेल्वे
रेल्वे प्रशासनाने तत्काळ दखल घेत महिलेला रुग्णालय सेवा पुरविण्याचा प्रयत्न केला. मात्र पालिका रुग्णालयाने सेवेअभावी आईसह त्या चिमुकल्याला चार तास ताटकळत ठेवले. हे फार चुकीचे असून, या प्रकरणी आम्ही पालिकेकडे तक्रार केली. प्रशासन एवढे उदासीन असू शकते याची खंत वाटते.
- एम. डॅनियल,
मुलुंड रेल्वे स्टेशन प्रबंधक
सुदैवाने बाळ आणि आईची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत.
- डॉ. विद्या ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक, राजावाडी रुग्णालय, घाटकोपर
रुग्णालयात नावनोंदणी असूनही...
प्रियांका हिची सावरकर रुग्णालयातच नावनोंदणी करण्यात आली होती. तिथे तिच्यावर उपचारही सुरू होते. असे असतानाही संबंधित रुग्णालय प्रशासनाने तिला तेथे दाखल करून घेतले नाही. विशेष म्हणजे प्रियांकाची आईही याच रुग्णालयात कक्षसेविका म्हणून कार्यरत आहे.
घटनाक्रम...
रात्री ९.२० वा. - पोटात दुखत असल्याने आंबिवली स्थानकातून सीएसटी लोकल पकडली
रात्री १०.१० वा. - ठाणे स्थानकादरम्यान बाळाचा जन्म
रात्री १०.२५ वा. - मुलुंड स्थानकातून खाजगी रुग्णवाहिकेतून रुग्णालयाच्या दिशेने नेले
रात्री १०.३० वा. - मुलुंड मॅटर्निटी होम, उपचारासाठी नकार
रात्री ११.२३ वा. - मुलुंड सावरकर रुग्णालयाचाही दाखल करून घेण्यास नकार
मध्यरात्री २.३० वा. - राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल