परळ गावातील रस्त्यांना आकारच नाही!
By Admin | Updated: February 16, 2017 02:34 IST2017-02-16T02:34:29+5:302017-02-16T02:34:29+5:30
काळाचौकी ते परळ गावपर्यंत तयार केलेल्या रस्त्यांना आकारच नसून येथील दुकाने रस्त्यांच्या उंचीहून खाली गेल्याचे दिसत आहे.

परळ गावातील रस्त्यांना आकारच नाही!
मुंबई : काळाचौकी ते परळ गावपर्यंत तयार केलेल्या रस्त्यांना आकारच नसून येथील दुकाने रस्त्यांच्या उंचीहून खाली गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील रस्ते बांधणीत भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणी कंत्राटदारांसह अभियंत्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
काळाचौकीतील साईबाबा पथ, गं. द. आंबेकर मार्ग आणि एस.एस. राव या मार्गांची दुरवस्था झाली आहे. गं.द.आंबेकर मार्गावरून जाताना तर नेमका हा रस्ता किती कंत्राटदारांनी तयार केला आहे, असा संशय येतो. कारण या एकाच मार्गावर डांबरी आणि सिमेंटचा रस्ता बांधण्यात आला आहे. शिवाय रस्ता एकसमान तयार करण्यात आला नसून, रस्त्याशेजारील दुकानांच्या तुलनेत रस्त्याची उंची अधिक झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी दुकानात शिरण्याची भीती व्यक्त होत आहे. एकंदरीत पाहणी केली असता, येथील रस्ता तयार करताना सर्व नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप मनसेचे विभागाध्यक्ष सचिन देसाई यांनी केला आहे.
देसाई म्हणाले की, एस.एस. राव मार्गावरील खड्डे पाहिल्यास रस्त्याच्या निकृष्ट दर्जाचा अंदाज येतो. तर साईबाबा पथावरील सुरू असलेल्या मोनो रेलच्या कामामुळे रस्त्याची चाळण झालेली आहे. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी स्थानिक नगरसेविकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना अटक केलेली आहे. त्यात येथील रस्त्यांची दुर्दशा पाहून रस्ते बांधणीतही घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने येथील सर्व रस्त्यांच्या कंत्राटांची चौकशी करण्याची गरज आहे.
परळ गाव आणि काळाचौकीला जोडणाऱ्या या तिन्ही मार्गांवर गेल्या वर्षभरात कित्येक तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती संतोष नलावडे यांनी दिली आहे. या मार्गांवर महर्षी दयानंद महाविद्यालय, गांधी रुग्णालय, के.ई.एम. रुग्णालय, बेस्ट वसाहत अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत.
त्यामुळे दररोज हजारो तरुण-तरुणी, रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक या मार्गांचा वापर करतात. मात्र, खड्ड्यांच्या नाहक त्रासापासून स्थानिकांची सुटका करण्यात स्थानिक नगरसेविका सपशेल अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे किमान या निवडणुकीनंतर तरी स्थानिकांची या त्रासातून सुटका व्हावी, अशी मागणी नलावडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)