वरखंडच्या आश्रमशाळेची परवड
By Admin | Updated: June 9, 2014 00:25 IST2014-06-09T00:25:42+5:302014-06-09T00:25:42+5:30
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे चालविल्या जाणाऱ्या शासकीय आश्रमशाळा वरखंडमधील आदिवासी विद्यार्थ्यांची परवड सुरूच आहे

वरखंडच्या आश्रमशाळेची परवड
सुरेश काटे, तलासरी
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे चालविल्या जाणाऱ्या शासकीय आश्रमशाळा वरखंडमधील आदिवासी विद्यार्थ्यांची परवड सुरूच आहे. शासकीय आश्रमशाळा वरखंडला स्वत:ची इमारत नसल्याने आश्रमशाळा भाड्याच्या इमारतीत सुरू असून पाणी समस्येसोबतच अपुरी शौचालये असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे.
या आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांची परवड पाहून आदिवासी विकास राज्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी २४ एप्रिल रोजी मोठ्या धुमधडाक्यात आश्रमशाळेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमाला आदिवासी विभागातील अधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे वरखंड आश्रमशाळेच्या बांधकामाचा प्रस्तावच मंजूर नसताना व निधीही मंजूर नसताना केलेले भूमिपूजन व आदिवासी लोकांना दिलेले आश्वासन हवेतच विरले व आदिवासी विद्यार्थ्यांच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली.
वरखंड आश्रमशाळेसाठी दापचरी दुग्ध प्रकल्पातील १० एकर जमीन घेण्यात आली आहे. १३ आॅक्टोबर २०१० रोजी जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडून जमीन आदिवासी विकास विभागाकडे हस्तगत करण्यात आली. या जागेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे भूमीअभिलेख खात्याकडून सीमांकन करून घेतले व या जागेत शाळा, इमारत मुला-मुलींचे वस्तीगृह, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, विद्युतीकरण या बाबतचे वास्तुशास्त्रज्ञ, मुंबई यांनी वास्तु आराखडे तयार केले व २००९-१० मध्ये ५ कोटी ७४ लाख रू. चा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांच्याकडे पाठविला. या प्रस्तावाला अजूनपर्यंत मान्यता मिळालेली नाही. प्रस्ताव लालफितीत अडकला असल्याने आश्रमशाळेसाठी निधीही नाही.