राजापूर तालुक्यातील जमिनीवर परप्रांतीयांचा डोळा

By Admin | Updated: February 6, 2015 00:47 IST2015-02-06T00:01:46+5:302015-02-06T00:47:39+5:30

दारिद्र्यामुळे गांजलेल्या लोकांनी आता आपल्या रोजीरोटीचे साधन असलेल्या या जमिनींची विक्रीच सुरू केली आहे.

Parapanti's eye on ground in Rajapur taluka | राजापूर तालुक्यातील जमिनीवर परप्रांतीयांचा डोळा

राजापूर तालुक्यातील जमिनीवर परप्रांतीयांचा डोळा

विनोद पवार - राजापूर -पाचवीला पूजलेले दारिद्र्य, शेतीबाबत नसलेली जागृती यामुळे राजापूर तालुक्यातील जमीन हळूहळू परप्रांतीयांच्या घशात जाऊ लागली आहे. स्थानिकांची फसवणूक करून एजंटांच्या माध्यमातून याठिकाणची बहुतांश जमीन परप्रांतीयांनी गिळंकृत केल्याने संपूर्ण राजापूर तालुका विकला जातोय की काय? असे म्हणण्याची वेळ आली आहे.
राजापूर तालुक्यात गेली काही वर्षे जमिनीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. दारिद्र्यामुळे गांजलेल्या लोकांनी आता आपल्या रोजीरोटीचे साधन असलेल्या या जमिनींची विक्रीच सुरू केली आहे. मिळेल त्या भावाने विक्री होत असून या गरीब लोकांच्या अगतिकतेचा फायदा दलाल उठवत आहेत.गेल्या पाच वर्षात राजापूर उपनिबंधक कार्यालयात जमीन खरेदी - व्रिकीच्या सुमारे नऊ हजार व्यवहारांची नोंद झाली आहे. पूर्व विभागात होऊ घातलेले पाटबंधारे प्रकल्प व पश्चिम किनारपट्टीवर येत असलेले मोठमोठे औद्योगिक प्रकल्प यामुळे येथील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. आता काही दलालांनी राजापूर तालुक्यातील शेतजमिनी वेब पेजवर विक्रीसाठी काढल्या आहेत. राजापूर तालुक्याच्या पूर्व विभागात म्हणजेच सह्याद्र्रीच्या कुशीतील गावांमध्ये अनेक सिंचन प्रकल्प होत आहेत. त्यामुळे आतापासूनच तालुक्याच्या पूर्व विभागात अनेक जमिनींमध्ये पांढऱ्या सोन्याची म्हणजेच ऊस लागवड केली जात आहे. यावर्षी पाचल परिसरातील सुमारे ११२.६१ हेक्टर जमीन ऊस लागवडीखाली आल्यामुळे अनेक धनदांडग्यांच्या नजरा आता येथील जमिनीकडे वळल्या आहेत.
सागरी किनारपट्टीवर माडबन येथील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, वेत्ये येथील राजापूर शिपयार्ड प्रकल्प, तुळसुंदे येथे होऊ घातलेला जहाजबांधणी प्रकल्प, तर सोल्ये रेल्वे स्टेशन येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहत यामुळे जमिनीची मागणी वाढली आहे.
तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीलगत असणाऱ्या जमिनींच्या दराच्या तुलनेत पूर्व विभागातील जमिनी दलाल मंडळी शेतकऱ्यांकडून कवलीमोल दराने विकत घेतात. त्यानंतर लाखो रुपये एकर दराने विकल्या जात आहेत. लाखो रुपये एकर दराने विकल्या जाणाऱ्या दराचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. येथील दलाल मात्र शेतकऱ्यांची फसवणूक करून गब्बर झाले आहेत.
पूर्व परिसर मोठ्या प्रमाणात सह्याद्र्रीच्या रांगांमध्ये वसलेला असल्यामुळे या भागात अगोदरपासूनच कॅशक्रॉप म्हणून ओळखले जाणारे काजू उत्पादन चांगल्या प्रमाणात येते. आता ऊस उत्पादनही चांगल्या प्रकारे येऊ लागल्यामुळे परप्रांतीय धनदांडग्यांनी येथील दलालांना हाताशी धरून जमिनी खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
एकीकडे जमिनीच्या सातबारा सदरी अनेक सहहिस्सेदारांची नावे असली तरी हे दलाल तलाठ्यांना हाताशी धरून काही नावे आपल्या सोयीनुसार बदलून घेत आहेत. त्यातच शासनाच्या सातबारा संगणकीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात चुका आहेत. त्यामध्ये अद्याप सुधारणा झालेली नाही. तसेच राजापूर तहसील कार्यालयातील सातबारा संगणकीय यंत्रणा बंद असल्यामुळे त्याचा गैरफायदा दलालांकडून उठवला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे.

Web Title: Parapanti's eye on ground in Rajapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.