Join us  

परमबीर सिंग यांची एनआयएकडून कसून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 3:29 AM

प्रदीप शर्मांची झाडाझडती; गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रश्नांची सरबत्ती, तपास निर्णायक टप्प्यात

मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटेेलिया या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटक कार आणि ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व होमगार्डचे महासमदेशक परमबीर सिंग आणि माजी पोलीस निरीक्षक व वादग्रस्त एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्याकडे बुधवारी कसून चौकशी केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेशी असलेले संबंध आणि गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याशी साधलेला संपर्काबाबत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्याचे समजते.परमबीर सिंग एकूण ४ तास  एनआयएच्या पेडर रोड येथील कार्यालयात होते. आवश्यकता वाटल्यास त्यांना पुन्हा बाेलावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले तर प्रदीप शर्मा यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.गेल्या जवळपास महिन्याभराच्या तपासात एनआयएच्या पथकाने बुधवारी पहिल्यांदाच अतिवरिष्ठ आणि नावाजलेल्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. तत्कालिन आयुक्त परमबीर सिंग आणि प्रदीप शर्मा यांच्याकडे चौकशी केल्याने या प्रकरणाचा तपास निर्णायक टप्प्यात आल्याचे स्पष्ट होते.या गुन्ह्यामध्ये वाझेला १३ मार्चला अटक झाल्यानंतर राज्य सरकारने १७ मार्चला परमबीर सिंग यांची होमगार्डला बदली केली. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी एपीआय वाझेला दर महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला. सध्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय या आरोपाची प्राथमिक चौकशी करत आहे तर देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले.

सिंग यांच्याकडे काय झाली विचारणा?सुमारे चार तासांच्या चौकशीत एनआयएने परमबीर सिंग यांच्याकडे स्फोटक कार, मनसुख हिरेन हत्या आणि सचिन वाझेच्या अनुषंगाने सविस्तर विचारणा केल्याचे समजते. वाझेला पुन्हा सेवेत घेणे, एपीआय असताना सीआययूच्या प्रमुखपदी नेमणे आणि स्फोटक कार प्रकरणासह सर्व महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास त्याच्याकडेच का दिला, त्याबद्दल कोणाच्या सूचना होत्या, याबद्दल त्याचा जबाब नोंदविण्यात आल्याचे समजते.  नियुक्ती, स्फाेटक कारप्रकरणी सविस्तर जबाब नाेंदविलापरमबीर सिंग बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एनआयए कार्यालयात पोहोचले. एनआयएचे विशेष महानिरीक्षक शुक्ला यांच्या कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली. वाझेला मुंबई पोलीस दलात पुन्हा घेण्यापासून ते अँटिलिया स्फोटक कार प्रकरणाचा तपास त्याच्याकडे सोपविण्यापर्यंतच्या आदेशाबाबत सविस्तर जबाब नोंदविण्यात आल्याचे समजते. दुपारी १ वाजून २० मिनिटांच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले. जवळपास ३ तास ५० मिनिटे त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत माजी पोलीस अधिकारी आणि वादग्रस्त एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा पाऊणच्या सुमारास एनआयएच्या कार्यालयात आले. हिरेन यांच्या हत्येबाबत आणि वाझेशी असलेल्या संबंधांबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. सुमारे आठ तास त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू होती.

टॅग्स :परम बीर सिंगराष्ट्रीय तपास यंत्रणा