Join us  

...तेव्हा परमबीर सिंह थरथर कापत होते; अनिल देशमुख यांचा आयोगासमोर दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 8:18 AM

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे वकील योगेश नायडू यांनी आयोगासमोर देशमुख यांची उलटतपासणी करताना बरेच प्रश्न केले.

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ ठेवलेल्या स्फोटकांबाबतची माहिती राज्य सरकारपासून का दडवून ठेवली, असे मी आणि तीन अतिरिक्त मुख्य सचिवांनी विचारले तेव्हा पोलीस आयुक्त असलेले परमबीर सिंह थरथर कापत होते, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी न्या. कैलास चांदीवाल आयोगासमोर केला.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे वकील योगेश नायडू यांनी आयोगासमोर देशमुख यांची उलटतपासणी करताना बरेच प्रश्न केले. त्यांच्या उत्तरात देशमुख यांनी हा दावा केला. वाझे हे आपल्या इतक्या जवळचे होते, तर मग त्यांनी तुम्हाला अँटिलिया स्फोटकांप्रकरणी माहिती दिली नव्हती का, असेही आम्ही परमबीर सिंह यांना विचारले होते. तेव्हा वाझेने काय केले, हे आपल्याला माहिती नसल्याचे परमबीर यांनी म्हटले होते, असे देशमुख यांनी सांगितले. अँटिलिया स्फोटके प्रकरणाची चौकशी एटीएस; मुंबईकडे द्यावी असे मी तीन अधिकाऱ्यांसमोर परमबीर सिंह यांना सुचविले, पण त्यांनी त्यास विरोध केला होता, असा दावाही देशमुख यांनी केला. शेवटी, आम्ही तो तपास एटीएसकडे देण्याचा निर्णय ६ मार्च २०२१ रोजी घेतला. ७ मार्चला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला, असे देशमुख यांनी सांगितले.डी.सी. डिझाइन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसंदर्भात एक तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित झाला होता. त्याबाबत त्यांनी इतर अधिकाऱ्यांसोबत ब्रिफिंग केले होते, इतर प्रकरणांमध्ये त्यांच्याशी वैयक्तिक बोलचाल झाल्याचे मला आठवत नाही, असेही देशमुख यांनी सांगितले. पत्रकार अर्णव गोस्वामी यांना अटक केली म्हणून वाझेवर अँटिलियाप्रकरणी खोटे आरोप लावण्यात आले होते, असे आपण विधानसभेत सांगितले होते का, असा प्रश्न वकिलांनी केला असता देशमुख म्हणाले की, मी वाझे यांचा सभागृहात बचाव करण्याचा प्रश्नच नाही. अँटिलिया प्रकरणात विरोधी पक्षनेत्यांनी काही मुद्दे उपस्थित केले, तेव्हा मी विस्ताराने माहिती घेऊन सभागृहात उद्या सांगेन, एवढेच म्हणालो होतो.

टॅग्स :अनिल देशमुखपरम बीर सिंग