समांतर रस्ता, उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे
By Admin | Updated: December 23, 2014 22:41 IST2014-12-23T22:41:39+5:302014-12-23T22:41:39+5:30
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर समांतर मार्ग व उड्डाणपुलाच्या कामास तत्कालीन आघाडी सरकारने वर्षभरापूर्वी मंजूरी दिली होती.

समांतर रस्ता, उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे
दीपक मोहिते, वसई
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर समांतर मार्ग व उड्डाणपुलाच्या कामास तत्कालीन आघाडी सरकारने वर्षभरापूर्वी मंजूरी दिली होती. परंतु, यासंदर्भात अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या दोन प्रकल्पामुळे वसई-विरार हा परिसर मुंबईच्या नजीक येणार आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील बापाणे ते नायगांव पश्चिम भागाला जोडणारा महत्वाकांक्षी उड्डाणपुल व भार्इंदर येथील खाडीपुलावरून हलक्या वाहनांसाठी समांतर पूल असे हे दोन प्रकल्प आहेत. परंतु, त्या कामास अद्याप सुरूवात न झाल्यामुळे या दोन्ही प्रकल्पांचे भिजत घोंगडे झाले आहे.
वसई-विरारहून मुंबईला रस्त्यामार्गे जाण्याकरीता केवळ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु, या महामार्गावर अपघात झाल्यास प्रचंड वाहतुककोंडी होते. वर्षापूर्वी भार्इंदर फाऊंटन येथे खाडीत पूल ढासळल्यामुळे सुमारे ६ महिने एकाच मार्गावरून वाहतूक सुरू होती. मुंबईला ये-जा करणाऱ्या नागरीकांना त्यावेळी अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले होते. रेल्वे वाहतूक या व्यतिरिक्त आणखी एक मार्ग उपलब्ध झाल्यास वसईकर नागरीकांना मुंबई कमी वेळात गाठता येईल याकरीता भार्इंदर खाडीवर हलक्या वाहनासाठी समांतर पूल व्हावा असे प्रयत्न गेल्या १० वर्षापासून सुरू होते.
अखेर गेल्यावर्षी तत्कालीन आघाडी सरकारने या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवला. परंतु आता राज्यात सरकार बदलल्यामुळे आघाडी सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी युती सरकार करणार का ? असा प्रश्न उभा ठाकला आहे.
या कामासाठी सल्लागार म्हणून एका खाजगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. तर येथील महामार्गावर बापाणे ते नायगांव पश्चिम दरम्यान आवश्यक उड्डाणपुलासाठी १०८ कोटी रू. ची तरतूद करण्यात आली असून सदर काम मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या माध्यमातून होणार आहे.
ही विकासकामे लवकर मार्गी लागल्यास वसई विरार तसेच लगत असलेल्या गुजरात नागरीक व उद्योजकांना कमी वेळात मुंबई गाठणे सहज शक्य होईल.