Join us

प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 06:17 IST

मध्य रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा याेग्य प्रकारे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसला आहे. 

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल स्थानकावरील स्टॅटिक क्यूआर कोडद्वारे पेपरलेस मोबाइल तिकीट बुकिंग गुरुवारपासून बंद करण्यात आली. रेल्वेच्या यूटीएस ॲपच्या माध्यमातून स्थानकात असलेले क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढण्याच्या सुविधेचा प्रवाशांकडून गैरवापर सुरू होता. त्यामुळे ही सुविधा बंद करण्यासाठी मध्य रेल्वेने बोर्डाला जुलै महिन्यात पत्र पाठवले होते. 

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या जिओफेन्सिंग क्षेत्रात मुंबई लोकलचे तिकीट काढण्यासाठी रेल्वेने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यापैकी एक म्हणजे यूटीएस ॲप तिकीट काढताना प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी, त्यांचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी २०१६ मध्ये यूटीएस मोबाइल ॲप्लिकेशन सुरू केले. २०२४ या वर्षात मध्य रेल्वेवर दररोज सुमारे ६ लाख १० हजार प्रवाशांनी ‘यूटीएस’चा वापर केला. या ॲपद्वारे स्टेशनवर क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढता येते. परंतु, तिकीट नसलेले प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये कोड स्कॅन करून तिकीट काढत असल्याने बंदी घातली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा याेग्य प्रकारे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसला आहे. 

कोड वेबसाइटवर उपलब्धरेल्वेचे कोड इंटरनेटवरील अनेक वेबसाइटवर सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे तिकीट तपासनीस (टीसी) लोकलमध्ये येताच अनेक विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी तो कोड स्कॅन करून तिकीट काढतात. तिकीट तपासनिसांकडून अशा वारंवार तक्रारी येत असल्याने ही सुविधा बंद केल्याचे अधिकारी म्हणाले.

‘डायनॅमिक’ ठरेल उपयुक्त रेल्वे स्थानकातील क्यूआर कोड स्थिर आहेत. परिणामी, ते सहज गैरवापर करणाऱ्यांना उपलब्ध होऊ शकतात. ही बाब लक्षात घेता सतत बदलणारे डिजिटल क्यूआर कोड उपलब्ध करणे गरजेचे आहे. या काेडमुळे गैरवापर करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांना आळा बसेल. त्यामुळे डायनॅमिक अर्थात सतत बदलणारे क्यूआर कोड रेल्वे स्थानकात उपलब्ध केल्यास अशा घटना सहज रोखता येणे शक्य होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई लोकल