पनवेलकरांना हक्काचे क्रीडा संकुल
By Admin | Updated: January 6, 2015 01:04 IST2015-01-06T01:04:45+5:302015-01-06T01:04:45+5:30
राजकीय नेत्यांची क्रीडा संकुले असली तरी पनवेलकरांना हक्काचे क्रीडा संकुल उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.

पनवेलकरांना हक्काचे क्रीडा संकुल
पनवेल : राजकीय नेत्यांची क्रीडा संकुले असली तरी पनवेलकरांना हक्काचे क्रीडा संकुल उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आऊटडोअर आणि इनडोअर स्टेडियम या ठिकाणी साकारणार आहे. त्यामुळे यापुढे पनवेलकरांना हक्काच्या क्रिडासंकुलात आपल्या आवडीचे खेळ खेळता येणार आहे.
पनवेलची शहराकडून महानगराकडे वाटचाल सुरू असून या भागात अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्प येऊ घातले आहेत. त्याचबरोबर पनवेल नगरपालिका आणि सिडको हद्दीत दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे. एकंदरीतच नागरिकरणाची कक्षा रूंदावत चालल्या आहेत. शहरी बहुल लोकवस्ती असलेल्या पनवेल तालुक्यात ग्रामीण भागही बऱ्यापैकी आहे. या परिसरातही पायाभुत सुविधा पोहचविण्यास सुरूवात झाली आहे. त्यामध्ये विशेषत: आदिवासी वाडे आणि पाडयांचा समावेश आहे. पनवेल विभागात विविध क्षेत्रातील कलाकार नावारूपाला येत असताना तालुक्यातील क्रिडापट्टूंची संख्या कमी नाही. विविध खेळात नैपूण्यप्राप्त करू इच्छिणाऱ्या युवा युवतींना हक्काचे क्रिडासंकुलाचा अभाव होता. भागात खाजगी क्रिडा संकुले उभारले असले तर त्याचा सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडूंना फारसा फायदा होत नाही. धनदांडगे या ठिकाणी शुल्क भरून येथील सुविधांचा लाभ घेतात आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्यांना या ठिकाणी किती संधी मिळते हा संशोधाचा विषय आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करून पनवेल येथे तालुका क्रिडा
संकुल उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला. शहरातील अंतिम भूखंड क्रमांक ५३८ या प्रकल्पाकरीता देण्यात आला आहे.
यासंदर्भात पनवेल नगरपालिकेने ठराव सुध्दा पारित करून हिरवा कंदील दिला आहे. त्याचबरोबर २००९ साली शासनाने प्रशासकीय मंजूरी दिली होती. राज्य शासनाने तालुका क्रीडा संकुलाच्या प्रस्तावाला आर्थिक मंजूरी दिली असून प्रत्यक्ष कामालाही सुरूवात झाली आहे. यामुळे स्थानिक खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (वार्ताहर)
आऊटडोअर खेळाकरीता खास कोर्ट आणि मैदान
च्क्रिडा संकुलात आऊटडोअर खेळ खेळण्याकरीता त्याचबरोबर सरावासाठी खास सोय करण्यात येणार आहे. येथे २०० मीटर लांबीची धावपट्टी, कबड्डी, खो-खो, हॉलीबॉलसाठी प्रत्येकी दोन दोन मैदान तयार करण्याचा प्रस्ताव आहे. या व्यतिरिक्त या संकुलात येणाऱ्या वाहनांकरीता खास दोन वाहनतळ उभारण्यात येतील. व्यवस्थापन निवासही बांधण्यात येणार आहे.
च्१६८९५.८२ इतक्या क्षेत्रफळावर तळमजला अधिक एक असे इनडोअर स्टेडियम बांधण्याचा प्रस्ताव आहे. तळ मजल्यावर दोन बॅटमिंटन कोर्ट, जिमनॅशियम, स्त्रिया आणि पुरूषांकरीता स्वच्छतागृह, साहित्यकक्ष आणि कार्यालय असेल. पहिल्या मजल्यावर १०० मीटर शुटींगरेज, शस्त्रकक्ष, आणि स्वच्छतागृह असेल.