लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई प्रदेशात रेल्वेची क्षमता वाढवणे आणि कामकाज सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने पनवेल-सोमटने आणि पनवेल-चिखली दरम्यान एकूण ७.५४ किमी लांबीच्या पनवेल कॉर्ड लाईन्स बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ४४४.६४ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मध्य रेल्वेकडून राबविला जाणार आहे.
पनवेल हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावरील एक महत्त्वाचे टर्मिनल आहे, त्याच्या उत्तरेकडे दिवा, दक्षिणेकडे रोहा, पश्चिमेकडे जेएनपीटी आणि पूर्वेकडे कर्जत असे मार्ग जातात. त्यामुळे हे एक महत्त्वाचे जंक्शन आहे. सध्या, ग्रेड-सेपरेटेड क्रॉसिंग नसल्यामुळे इंजिन रिव्हर्सल करावे लागते. त्यामुळे पुढील प्रवासासाठी विलंब होतो.
राहुरी ते शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गाला मान्यता
रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील राहुरी ते शनी शिंगणापूर येथे जोडणाऱ्या नव्या रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. २१.८४ किमी लांबीचा हा मार्ग ४९४.१३ कोटींच्या मंजूर खर्चाने विकसित केला जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या शनी शिंगणापूर येथे सध्या थेट रेल्वे जोडणीचा अभाव आहे. या मार्गामुळे येथे पोहोचणे शक्य होईल. या रेल्वे मार्गामुळे शिर्डी, राहु-केतू मंदिर (राहुरी), मोहिनी राज मंदिर (नेवासा) आणि पैस खांब करवीरेश्वर मंदिर (नेवासा) यासारख्या इतर धार्मिक, पर्यटन स्थळांनाही फायदा होईल. ज्यामुळे स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.